साळगाव बंधाऱ्यावरील वाहतूक सात दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:29+5:302021-04-08T04:24:29+5:30
आजरा : चार महिन्यांपूर्वी कोसळलेल्या साळगाव बंधाऱ्याच्या पिलरचे काम पाटबंधारे विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे साळगाव बंधाऱ्यावरून वाहतूक करणे ...
आजरा
: चार महिन्यांपूर्वी कोसळलेल्या साळगाव बंधाऱ्याच्या पिलरचे काम पाटबंधारे विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे साळगाव बंधाऱ्यावरून वाहतूक करणे सध्या धोकादायक आहे. पिलरच्या दुरुस्तीचे काम ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान होणार असल्याने आजरा-साळगाव मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी सोहाळे रस्त्याने वळविण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एन.डी. मळगेकर यांनी दिली आहे.
हिरण्यकेशी नदीवर ५३ वर्षांपूर्वी बांधलेल्या साळगावजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक पिलर डिसेंबरमध्ये कोसळला होता. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक थांबविण्यासंदर्भात बांधकाम विभाग व पंचायत समितीला कळविण्यात आले होते; मात्र अद्यापही या मार्गावरील वाहतूक सुरू आहे. सध्या बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने बंधाऱ्याच्या पिलरचे काम तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १४ एप्रिल अखेर बंद राहणार आहे. त्यामुळे आजरा ते साळगाव रस्त्यावरील एसटीसह सर्व प्रकारची वाहतूक सोहाळे मार्गे पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे. पेरणोली, साळगाव, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, विनायकवाडी यांसह या मार्गे गारगोटीला जाणाऱ्या प्रवाशांनी सोहाळे मार्गे जाऊन सहकार्य करावे. सदर पिलरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाचा अहवाल घेऊन बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे, अशीही माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी एन.डी. मळगेकर यांनी दिली.