महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाले एकांकिकेतून वाहतूक शिस्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:46 AM2019-06-28T11:46:50+5:302019-06-28T11:48:50+5:30
कोल्हापूर येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
कोल्हापूर : येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कोल्हापूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ए. व्ही. गुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. शरद भुताडिया यांनी नाटकाचा प्रबोधनासाठी कसा उपयोग होतो, हे सांगितले. १0८ अॅम्ब्युलन्स सेवेचे कोल्हापूर विभागाचे झोनल मॅनेजर मोराळे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. सुनील पाटील यांनी रस्ते अपघातांचे वास्तव तरुणांची जबाबदारी अधोरेखित केली. लेखक संजय कात्रे यांनी एकांकिकेमागील भूमिका विशद केली.
यानंतर उपस्थितांनी आम्ही वाहतुकीचे नियम पाळू आणि गाडी चालविताना मोबाईलवर बोलणार नाही, अशी शपथ घेतली. न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी एकांकिका सादर करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे तसेच संस्थेचे सेक्रेटरी हेरवाडे यांचे संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे विशेष आभार मानण्यात आले.
कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ए. व्ही. गुजर, डॉ. सुनील पाटील, डॉ. शरद भुताडिया, संजय कात्रे उपस्थित होते.