जीवदानासाठीची ‘श्रीकृष्ण’ची धडपड व्यर्थच
By admin | Published: September 30, 2015 12:30 AM2015-09-30T00:30:52+5:302015-09-30T00:34:59+5:30
विद्युत तारांवर दुपारी दोऱ्यात अडकून एक कबूतर लोंबकळत होते. त्यातून सुटका करण्यासाठी ते जिवाचा आकांत करून ओरडत होते. मात्र, त्याचा आवाज डॉल्बीच्या आवाजात विरून जात होता
विजय दळवी -कोल्हापूर --अखंडपणे डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोषाने थिरकणाऱ्या तरुणाईला ‘त्याच्या’कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. कारण तो असाहाय्य पक्षी होता. पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यात पंख अडकून जखमी झाल्याने खाली पडतानाच विजेच्या तारांमध्ये दोरा अडकल्याने तो खाली लोंबकळत होता. त्याच्या मदतीला ‘श्रीकृष्ण’ धावून आले; मात्र उपचार करून तो काही हाती लागला नाही.रविवारी सर्वत्र अनंत चतुर्दशीची धामधूम सुरू होती. शहरातील विसर्जनाच्या मुख्य मार्गावरील शुक्रवार पेठेतील जनवाडकर कॉम्प्लेक्सजवळ विद्युत तारांवर दुपारी दोऱ्यात अडकून एक कबूतर लोंबकळत होते. त्यातून सुटका करण्यासाठी ते जिवाचा आकांत करून ओरडत होते. मात्र, त्याचा आवाज डॉल्बीच्या आवाजात विरून जात होता. अनेक मंडळांचे कार्यकर्ते तर त्या कबुतराकडे पाहत माणुसकी विसरून हिडीस नृत्य करण्यात दंग होते. मात्र, त्याला अपवाद ठरले ते रेगे तिकटीवरील श्रीकृष्ण तरुण मंडळ. या मंडळाची मिरवणूक येथून जात असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना ते लोंबकळणारे ‘ते’ असाहाय्य कबूतर दिसले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला वाचविण्याची धडपड सुरू केली. यावेळी काठीच्या साहाय्याने त्या कबुतराला खाली उतरविले. त्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केला; मात्र उशीर झाल्याने त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. हीच माणुसकी यापूर्वी या मार्गावरून जाणाऱ्या इतर मंडळांनी दाखविली असती तर ‘त्या’ निष्पाप जिवाचे प्राण नक्कीच वाचले असते. पतंग उडविताना पतंगाचा मांजा दोरा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या जिवावर बेतू लागला आहे. नायलॉनच्या दोऱ्याने पर्यावरणास होणाऱ्या हानीमुळे मांजा दोऱ्याच्या वापरावर नागपूर पोलिसांनी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे; मात्र तरीही त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होताना दिसत नाही. त्यामुळेच आजही हजारो पक्षी जखमी व गतप्राण होत आहेत.
आमच्या मंडळाची मूर्ती घेऊन जाताना आम्हाला विजेच्या तारांमधून दोऱ्यात अडकलेले कबूतर दिसले. त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काठीच्या साहाय्याने खाली काढले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच ते गतप्राण झाले.
- दीपक निगवेकर,अध्यक्ष
श्रीकृष्ण तरुण मंडळ