वारणा उजवा कालवा समस्यांचा सापळा
By Admin | Published: March 24, 2015 08:01 PM2015-03-24T20:01:05+5:302015-03-25T00:47:28+5:30
शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज
राजाराम कांबळे -मलकापूर --शाहूवाडी -पन्हाळा तालुक्यांतील कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणून कर्नाटकमध्ये वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी सुरू केलेला वारणा उजवा कालवा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालव्याकरिता शासनाने १९७८ मध्ये १०० हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यानुसार सरूड ते कोडोली अशा ४४ कि. मी. दरम्यान रुंदी १६ फूट, तर खोली १२ फूट, असे या कालव्याचे सुमारे १६ कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात आले होते.कालव्यामध्ये उड्डाण व भुयारी डक्टचा समावेश करून या कालव्याचे काम पूर्णपणे गळती विरहित होण्याकरिता स्लॅब मजबुतीकरण, अस्तरीकरण, स्विसलँड तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. शासनाकडून सुरुवातीस सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. २००७ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण होणार होते. मात्र, गेली नऊ वर्षे या कालव्याचे काम रखडले आहे. शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिलेला नाही.दरम्यान, कालव्याच्या खुदाईच्या कामातून उपलब्ध माती-दगडांचे मोठे ढीग पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीचे ढीगही ढासळून खुदाईचे काम मुजून गेले आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामाला गळती लागून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी हेऊन जमीन नापीक बनू लागली आहे. कोतोली, तुरुकवाडी, रेठरे, आदी गावांतील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे झरे उमळू लागले आहेत.या कालव्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही गावांच्या वेशीपासून हा कालवा पुढे गेल्याने तेथील रस्ता दोन्ही बाजूंनी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा कालवा पुढे जाण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील जमीन शासनाने संपादित केलेली नाही.
शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, तुरुकवाडी, भेडसगाव, सरूड, डोणोली, चरण, आदी गावांतून कालवा गेला आहे. येथील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या कालव्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.
वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा
बनला आहे.
- शिवाजी सोनवळे, शेतकरी
शासनाने या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे व शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करावी.
- शारदा डोंगरे, सरपंच, ग्रामपंचायत चरण