बालकांना व्हेंटिलेटर कसा लावायचा याचे प्रशिक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:07+5:302021-05-27T04:26:07+5:30
कोल्हापूर : सर्वसामान्य कोरोनाबाधीत रुग्ण व बालकांवरील उपचारपद्धती वेगळी असते. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या बालकांना व्हेंटिलेटर ...
कोल्हापूर : सर्वसामान्य कोरोनाबाधीत रुग्ण व बालकांवरील उपचारपद्धती वेगळी असते. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या बालकांना व्हेंटिलेटर नेमके कसे लावायचे याचे प्रशिक्षण खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी सूचना बालरोगतज्ञांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला केली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे बालरोग तज्ञ डॉ. मोहन पाटील, डॉ.नरेंद्र नानिवडेकर, डॉ. अर्चना पाटील, डॉ. आनंद गुरव, डॉ. साईराज पवार यांच्यासह जिल्ह्यातील १४० बालरोग तज्ज्ञ यात सहभागी झाले.
यावेळी बालरोग तज्ज्ञांनी कोरोनाबाधित बालकांवर उपचार करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लावावे लागणार असेल तर त्यासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ असणे गरजेचे आहे. संभाव्य तिसऱी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे झाल्यास प्रत्येक बालरुग्णाला उपचारासाठी कोल्हापुरात पाठवण्याऐवजी त्यांच्यावर तालुक्याच्या ठिकाणीच योग्यरितीने उपचार करता येतील व शहरावरील ताण कमी होईल, अशी सूचना केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, किमान १ हजार बेडची तयारी करावी लागेल. साधे व ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल. तालुकानिहाय बेड वाढवावे लागतील.
१९० बेडची गरज
सीपीआरच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर यांनी आयसोलेशन, होम केअर करताना रुग्णांची अतिशय काळजी घ्यावी. या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सुमारे १९० च्या आसपास आयसीयू बेड लागतील, असे सांगितले.
--
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तयार ठेवा
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील लहान मुलांना कितपत कोरोना संसर्ग होईल याचा विचार करून बालरोग तज्ज्ञांनी व रुग्णालयांनी कोविड बालरुग्ण उपचार देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, प्रत्येकाने १० लिटरचे ५ ते १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेऊन ठेवावेत. फॅसिलिटी ॲप रोज अपडेट न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.
--
अडचणीच्या बाबी
मोठ्या व्यक्तींना संसर्ग झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल केले की प्रश्न मिटतो पण बालकांना बाधा झाली की पालकांनाही त्यांच्यासोबत राहावे लागते. कोविड वॉर्डात पालकांना राहता येणार का, त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून काय करता येईल, या बाबी अडचणीच्या ठरणार आहेत. लक्षणं नसलेल्या ५० टक्के व लक्षणे असलेल्या ४० टक्के बालकांवर घरीच उपचार करणे शक्य आहे. उर्वरित १० टक्के बालकांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे पण आता बाधितांना घरी न ठेवण्याच्या सूचना असल्याने यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल या बाबींबद्दल अस्पष्टता आहे.
--
फाेटो नं २६०५२०२१-कोल-बालरोग तज्ञ बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
---