दरड कोसळल्याने रेल्वेडबा रुळावरून घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:06+5:302021-07-24T04:17:06+5:30
मंगळूर जंक्शन -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस रेल्वे क्र. 01134 ही चिपळूण आणि कामठे दरम्यान वशिष्ठी नदीला पूर ...
मंगळूर जंक्शन -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस रेल्वे क्र. 01134 ही चिपळूण आणि कामठे दरम्यान वशिष्ठी नदीला पूर आल्याने मडगाव, लोंढा, मिरज मार्गे वळविण्यात आलेली रेल्वे दूधसागर -सोनोलीम दरम्यान दरड कोसळल्याने रुळावरून घसरली. दरड कोसळल्याने या रेल्वेचा इंजिनला लागून असलेला जनरल कोच आणि इंजिनचा काही भाग रुळावरून खाली उतरला होता. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. दरडीमुळे ही रेल्वे पुन्हा माघारी कुलेमला खेचून नेण्यात आली.
त्याचप्रमाणे हजरत निजामुद्दीन -वास्को-द-गामा स्पेशल एक्सप्रेस रेल्वे क्र. 02780 हिच्या मार्गावर करंजोळ -दूधसागर दरम्यान दरड कोसळल्यामुळे ही रेल्वे पुन्हा माघारी कॅसलरॉकला खेचून नेण्यात आली. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच कॅसलरॉक आणि वास्को-द-गामा येथून तत्काळ अपघात मदत रेल्वे (एआरटी) घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे क्र. 01134 या रेल्वेगाडीत 345 प्रवासी, तर रेल्वे क्र. 02780 या रेल्वेमध्ये 887 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रवाशांची कॅसलरॉक आणि कुलेम रेल्वे स्थानकावर चहा आणि उपहाराची सोय करण्यात आली होती.
२३ फोंडा रेल्वे