कुरुंदवाड अग्निशमन विभागाकडून प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:44+5:302021-06-16T04:32:44+5:30
कुरुंदवाड : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर येथील पालिका अग्निशमन विभागाकडून पालिका कर्मचारी, पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांना पंचगंगा-कृष्णा संगम घाटावर ...
कुरुंदवाड : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर येथील पालिका अग्निशमन विभागाकडून पालिका कर्मचारी, पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांना पंचगंगा-कृष्णा संगम घाटावर बोटींचे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात पालिका कर्मचारी, पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या अशा एकूण पन्नास जणांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित होते.
पावसाळ्यात प्रत्येकवर्षी शहरासह परिसराला महापुराचा मोठा फटका बसत असतो. मात्र, या नुकसानीत कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हा, तालुका प्रशासनासह येथील पालिका प्रशासन सतर्क असते. त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी जाधव यांनी पालिका अग्निशमन दलाच्यावतीने पालिका कर्मचारी, पोलीस दल आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांना कृष्णा नदीपात्रात बोटींचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महापुरात बुडणाऱ्याला वाचविणे, बुडालेल्या व्यक्तीच्या पोटातील पाणी बाहेर काढणे, पाण्याच्या प्रवाहात बोट चालविणे, बोटीचे इंजिन ऐनवेळी बंद पडल्यास हाताने वल्हे मारण्याचे प्रत्यक्ष कृतीने प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी शिरोळ महसूल विभागाकडून दोन बोटी उपलब्ध करण्यात आले होते.
पालिका अग्निशमन दलाचे फायरमन नितीन संकपाळ, पास रेस्क्यू फोर्सचे कृष्णात भेंडे, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांनी प्रशिक्षण दिले.
फोटो - १५०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे अग्निशमन दलाच्यावतीने संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचारी, पोलिसांना कृष्णा नदीपात्रात बोटींचे प्रशिक्षण देण्यात आले.