‘स्वाभिमानी’साठी लोकसभेची रंगीत तालीम

By admin | Published: February 14, 2017 12:07 AM2017-02-14T00:07:17+5:302017-02-14T00:07:17+5:30

शिरोळ राखण्याचे आव्हान : कुणाचा ‘हात’ हातात घेणार हीच उत्सुकता; मित्रपक्ष भाजपसोबत दरी वाढली

Training for the Lok Sabha for 'Swabhimani' | ‘स्वाभिमानी’साठी लोकसभेची रंगीत तालीम

‘स्वाभिमानी’साठी लोकसभेची रंगीत तालीम

Next


विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यादृष्टीने यंदाची जिल्हा परिषद निवडणूकही लोकसभेची रंगीत तालीमच आहे. कारण संघटना निकालानंतर काय भूमिका घेते, यावर भाजपची रणनीती ठरणार आहे. ‘स्वाभिमानी’ने त्यांचे सध्याचे आहे ते संख्याबळ राखून सत्ता समीकरणात काँग्रेसला साथ केली, तर पुढच्या लोकसभेला खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असणार हे नक्की. आता तरी भाजपकडून शिरोळ तालुक्यात ज्या पद्धतीने मोर्चेबांधणी केली जात आहे, अगदी ग्रामपंचायत समितीच्या सदस्यालाही फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता संघटना व भाजपमधील दरी रुंदावण्याचीच शक्यता ठळक आहे.
खरंतर स्वाभिमानी संघटना हा भाजपचा राज्याच्या राजकारणातील शिवसेने इतकाच विश्वासू मित्रपक्ष. दोन्ही काँग्रेसच्या त्यातही राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राळ उठविण्याचे काम मुख्यत: संघटनेने केले. त्याचा फायदा भाजपला लोकसभा व विधानसभेलाही झाला; परंतु आता भाजपला स्वबळावर सगळे राजकारण करायचे आहे. त्यात खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारने मुंबईत शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या समारंभास निमंत्रित केले नसल्याच्या रागातून भाजपवर बोचरी टीका केली.
भाजप आता शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडले आहे; परंतु जेम्स लेनच्या प्रकरणात भाजप कुठे होता, अशी विचारणा केल्यावर भाजपचीही पंचाईत झाली. तेथून संघटना व भाजपमधील दरी रुंदावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार नाही हे स्पष्टच होते. फक्त एकत्र येण्याच्यादृष्टीने वरकरणी बैठक झाली; परंतु पुढे काहीच घडले नाही. आता स्वाभिमानी जिल्हा परिषदेच्या २३ व पंचायत समितीच्या ४५ जागा लढवित आहे. त्यातही शिरोळ, हातकणंगले व पन्हाळा तालुक्यांत संघटनेने जास्त ताकद लावली आहे. गेल्या निवडणुकीत संघटनेच्या सर्व पाच जागा शिरोळ तालुक्यातून विजयी झाल्या व शिरोळमधील एक व हातकणंगले तालुक्यातील रुकडी मतदारसंघात त्यांचा उमेदवार कमी मतांनी पराभूत झाला होता. यावेळेला त्यांना त्यांचे होमपिच असलेल्या शिरोळमधूनच जास्त कडवे आव्हान आहे. शेट्टी यांच्या राजकारणावर जातीय आरोप होतो. विधानसभेलाही त्याचे प्रत्यंतर आले. त्यामुळे संघटनेने या निवडणुकीत सर्व जाती-धर्मातील सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे. संघटनेकडे आता शिरोळ पंचायत समितीची सत्ता आहे. जयसिंगपूर नगरपालिकेतही पक्षाने अस्तित्व दाखवून दिले आहे. त्यामुळे संघटना शिरोळ हा त्यांचा गड किती भक्कमपणे राखते, हीच खरी उत्सुकता आहे.
ऊसदराला संघटना..
मताला मात्र दुसरे..
संघटनेचा कार्यकर्ता लढाऊ असला तरी तो फाटका आहे. निवडणुकीच्या रणांगणातील इतर साधनसामग्रीत तो बराच मागे पडतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटनेच्या यशाला कायमच मर्यादा पडल्या आहेत. या निवडणुकीतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. लोकांनाही ऊसदराच्या आंदोलनात संघटनेचा बिल्ला आधार वाटतो; परंतु निवडणुकीत मात्र ते पुन्हा अन्य झेंड्यांच्या म्हणजेच प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला जातात, असा अनुभव कायमच येतो.
जालंदर मागे..
जनार्दन पाटील पुढे..
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रा. डॉ. जालंदर पाटील हे राशिवडे मतदारसंघातून ही निवडणूक लढवित होते; परंतूुत्यांनी सोमवारी ऐनवेळी माघार घेतली. परिते मतदारसंघातून संघटनेतर्फे जनार्दन पाटील (रा. परिते) हे रिंगणात आहेत. भोगावती परिसराचे ते संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि सगळी ताकद तिथेच लावली जावी यासाठी आपण माघार घेतल्याचे जालंदर पाटील यांचे म्हणणे आहे.
स्वाभिमानी या निवडणुकीत लढत असलेल्या जागा
जिल्हा परिषद २३ आणि पंचायत समिती : ४५
जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय उमेदवार :
शिरोळ-०७, हातकणंगले-०६, पन्हाळा-०४, राधानगरी आणि शाहूवाडी प्रत्येकी-०२ आणि करवीर व भुदरगड प्रत्येकी-०१.
पाच तालुक्यांत उमेदवार नाही
संघटना सात तालुक्यांत लढत आहे व पाच तालुक्यांत त्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही. चंदगड विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ने स्थानिक आघाडी केली आहे; परंतु हा पक्ष तिथे पाच पंचायत समित्या फक्त लढवित आहे. जिल्हा परिषदेची एकही जागा लढवित नाही.
निकालानंतर सत्त्वपरीक्षा..
स्वाभिमानीने गत सभागृहातील पाच हे संख्याबळ राखले आणि भाजपला सत्ता खेचण्यासाठी संघटनेची गरज लागली तर शेट्टी काय करणार हीच खरी सत्त्वपरीक्षा असेल. सध्या भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेलेले सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री आहेत. त्यामुळे संघटनेवरही निकालानंतर पाठिंब्यासाठी मोठा दबाव येऊ शकतो. संघटना आता तरी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी मिळते-जुळते घेण्याच्या मनस्थितीत आहे. मावळत्या सभागृहातही एकदाच सुरुवातीला काँग्रेसशी त्यांची आघाडी झाल्यावर पाच वर्षांसाठी महत्त्वाचे बांधकाम सभापतिपद संघटनेला देण्यात आले. पुन्हा या आघाडीबाबत कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही. भले लोकसभेला शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून कल्लाप्पाण्णा आवाडे रिंगणात उतरले तरी..! त्यामुळे मित्रपक्ष म्हणून तोंडावर हात फिरवून प्रत्यक्षात कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या पक्षापेक्षा काँग्रेसच बरी, अशी प्रतिक्रिया संघटनेचे कार्यकर्तेही आता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत.

Web Title: Training for the Lok Sabha for 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.