अधिकार मंडळांवरील नवनिर्वाचित सदस्यांना हवे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:35 PM2017-11-30T18:35:01+5:302017-11-30T18:42:24+5:30
जुन्या कायद्याच्या तुलनेत अनेक बदलांसह नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार शिवाजी विद्यापीठाची अधिसभा व अन्य अधिकार मंडळांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना या मंडळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ते लक्षात घेता या नवनिर्वाचित सदस्यांना अधिकार मंडळांच्या कामाची पद्धती, त्यांचे अधिकार आदींची माहिती देणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : जुन्या कायद्याच्या तुलनेत अनेक बदलांसह नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार शिवाजी विद्यापीठाची अधिसभा व अन्य अधिकार मंडळांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना या मंडळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ते लक्षात घेता या नवनिर्वाचित सदस्यांना अधिकार मंडळांच्या कामाची पद्धती, त्यांचे अधिकार आदींची माहिती देणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी घटकांचा विचार करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ हा नवीन कायदा शासनाने मार्च २०१७ पासून लागू केला. यापूर्वीच्या कायद्यामध्ये आणि या नवीन कायद्यामध्ये फरक आहे. तो समजून घेण्याची प्रक्रिया विद्यापीठातील घटकांकडून सुरू असतानाच या नव्या कायद्यानुसार अधिसभा, अन्य अधिकार मंडळांच्या निवडणुका पार पडल्या.
दि. ३० नोव्हेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे शासनाने सूचित केल्याने विद्यापीठासह या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व घटकांची धावपळ झाली. त्यात अनेकांना या अधिकार मंडळांचे कामकाज, त्याची पद्धती, अधिकार, कार्यकक्षा आदींची माहिती सखोलपणे घेता आली नाही.
निवडणुकीच्या माध्यमातून अनेक नवे चेहरे पहिल्यांदाच विद्यापीठाच्या अधिकार मंडळांवर काम करणार आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यापीठातील कामकाज हे संस्थात्मक, रचनात्मक आणि विधायक पद्धतीने होण्यासाठी त्यांना प्रत्येक अधिकार मंडळांच्या कार्यकक्षा, अधिकार यांची माहिती होणे महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने या नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित होणाऱ्या सर्व सदस्यांचे एक-दोनदिवसीय मार्गदर्शन शिबिर अथवा प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत नूतन सदस्य आणि विद्यापीठ क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
प्रशासनाला काय करता येईल
नवीन विद्यापीठ कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेतील तज्ज्ञ, गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या अधिकार मंडळांवर काम केलेल्या सदस्यांचे मार्गदर्शन आयोजित करता येईल. त्यासह विविध अधिकार मंडळांची माहिती आॅनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे सदस्यांना देता येईल.
विधायक, गुणात्मक, रचनात्मक पद्धतीने विद्यापीठाची वाटचाल होण्यासाठी विविध अधिकार मंडळांवरील नवनिर्वाचित, नामनिर्देशित आणि पदसिद्ध सदस्यांना नवीन विद्यापीठ कायद्याची आणि अधिकार मंडळांच्या कामकाजाची एकत्रितपणे माहिती देणे आवश्यक आहे.
-जे. एफ. पाटील,
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
अधिकार मंडळांवरील नूतन सदस्यांना या कायद्याबाबतची पूर्ण माहिती नाही. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नवीन कायद्याची माहिती देणारे शिबिर, कार्यशाळा या नूतन सदस्यांसाठी घ्यावी. याबाबतची मागणी विद्यापीठ विकास मंचदेखील विद्यापीठ प्रशासनाकडे करणार आहे.
- प्रा. शंकरराव कुलकर्णी,
कोल्हापूर विभागप्रमुख, विद्यापीठ विकास मंच.
विविध अधिकार मंडळांच्या सदस्यांची कर्तव्ये, जबाबदारी आणि ते काय करू शकतात याची माहिती नूतन सदस्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने अभ्यासवर्ग किंवा कार्यशाळा घ्यावी. त्याचा विद्यापीठासह आम्हा नूतन सदस्यांचा चांगला उपयोग होईल.
- पंकज मेहता,
नूतन सदस्य, नोंदणीकृत पदवीधर गट