महिलांना वाहन चालवण्याचे, तर विद्यार्थ्यांना उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:22 AM2021-03-24T04:22:03+5:302021-03-24T04:22:03+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा २०२१-२२ चा ३४ कोटी ८४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ समिती सभापती प्रवीण ...

Training women to drive, while students to repair equipment | महिलांना वाहन चालवण्याचे, तर विद्यार्थ्यांना उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण

महिलांना वाहन चालवण्याचे, तर विद्यार्थ्यांना उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा २०२१-२२ चा ३४ कोटी ८४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत मांडला. यावेळी सदस्यांच्या आग्रही मागणीनंतर प्रत्येक सदस्याला सात लाख रुपये स्वनिधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला. विविध विभागांच्या वतीने यावेळी नावीन्यपूर्ण योजनाही जाहीर करण्यात आल्या. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी वाहन चालवण्याचे तर विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील होते.

यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. अजयकुमार माने, मनीषा देसाई, संजय राजमाने, राहुल कदम यावेळी सभागृहात उपस्थित होते.

चौकट

जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा रु.१,३७,६२८ चा शिल्लकी अर्थसंकल्प

पंचायत समितींचा सन २०२१-२२ चा रू. ४,१०,४६६ चा शिल्लकी अर्थसंकल्प

चौकट

या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

१ बांधकाम विभागाच्या मूळ अपेक्षित जमामध्ये १५ लाखांची घट

२ कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठीच्या योजनांसाठी २ कोटी ५२ लाख

३ दिव्यांगांसाठीच्या योजनांसाठी २ कोटी ६१ लाख

४ विद्यार्थ्यांना गणवेश, शाळा देखभालीसाठी २९ लाख रुपये

५ डॉ. जे.पी. नाईक समृद्ध शाळा, डॉ. जयंत नारळीकर विज्ञान जाणीव जागृती अभियानासाठी २० लाख रुपये

६ प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्हीसाठी २० लाख रुपये

७ रस्ते सुधारणांसाठी १ कोटी

८ पाझर, गाव, बंधारे दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी ४० लाख रुपये

९ डोंगरी व दुर्गम भागातील नैसर्गिक झऱ्याभोवती संरक्षक कुंड बांधण्यासाठी ५० लाख रुपये

१० मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी आत्मबल विकास योजना

११ दोन वैद्यकीय अधिकारी नसलेल्या ठिकाणी मानधन तत्त्वावर डॉक्टर घेण्यासाठी २७ लाख

१२ कडबाकुट्टी मशीन पुरवणे - ४५ लाख

१३ सुधारित अवजारे पुरवणे - ४० लाख

१४ शेतकऱ्यांना पीव्हीसी-एचडीपीई पाइप पुरवणे - १५ लाख

१५ विधवा, परित्यक्ता, दारिद्र्यरेषेखालील महिलांना शेळी, तलंगा वितरणासाठी - १० लाख

१६ मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी - ६१ लाख

१७ दिव्यांगांना उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गासाठी- ६१ लाख

१८ ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना सानुग्रह अनुदान - ६८ लाख

१९ महिला, मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य, कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण - ६८ लाख

२० नाभिकांना केश कर्तनालयासाठी खुर्च्या, मोझर मशीन, सुतार, लोहार यांना व्यावसायिक साधने - ५० लाख रुपये

चौकट

या आहेत नावीन्यपूर्ण योजना

१ स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना, तरतूद : ८ लाख

प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रत्येक तालुका स्तरावर एका दवाखान्याला ५० हजारांचे, जिल्हा स्तरावरील पहिल्या दवाखान्यास १ लाख व दुसऱ्या क्रमांकाला ७५ हजार रुपयांचे बक्षीस

२ माता रमाई वाहन चालन प्रशिक्षण, तरतूद १५ लाख

मागासवर्गीय महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना या योजनेतून परवाना मिळवून देण्यात येणार आहे.

३ मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरतूद २५ लाख

४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यवसायवृद्धी योजना

याअंतर्गत विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोट

कोरोना परिस्थितीचा परिणाम या अर्थसंकल्पावर झाला आहे. राज्याचे न मिळालेले अनुदान हे यासाठी प्रमुख कारण आहे. तरीही उपलब्ध होणाऱ्या निधीचा विचार करून सर्व विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून महिला, मुली, अनुसूचित जातीच्या नागरिकांना अधिकाधिक लाभ देण्याचे नियोजन आहे.

-प्रवीण यादव,

सभापती, अर्थ समिती

कोट

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी काहीही उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या निधीवर जास्तीत जास्त व्याज कसे मिळेल, याचा विचार न केल्याने तीन कोटी रुपयांच्या व्याजाचे नुकसान झाले आहे. काही योजनांचे गेल्या आणि या वर्षीचे आकडे सारखेच आहेत. पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पैसे परत जाऊ नयेत याची दक्षता घेण्याची गरज आहे.

-प्रा. शिवाजी मोरे,

जिल्हा परिषद सदस्य

२३०३२०२१ कोल झेडपी ०१

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्थ समितीचे सभापती प्रवीण यादव यांनी मंगळवारी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सभागृहात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत सतीश पाटील, युवराज पाटील, डॉ. पदमाराणी पाटील, संजयसिंह चव्हाण आणि हंबीरराव पाटील होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Training women to drive, while students to repair equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.