कोल्हापूर मार्गावरील गाड्या रहाटागरातूनच सुटणार
By admin | Published: August 7, 2015 11:50 PM2015-08-07T23:50:41+5:302015-08-07T23:50:41+5:30
शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला.
रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेता रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या काही फेऱ्या थेट रहाटागर बसस्थानकातून सोडण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर मार्गावरील एस. टी.च्या ८० फेऱ्या रहाटागर बसस्थानकातून सुटणार आहेत. १० आॅगस्टपासून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बसस्थानक येथील वाहतूक समस्येविषयी चर्चा करण्यात आली होती. बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी बसस्थानकावरुन कोल्हापूर मार्गावरील गाड्या न सुटता त्या रहाटागरमधूनच सोडण्यात येणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानक ते रहाटागर ०.७ किलोमीटर इतके आहे. या फेऱ्यांमध्ये टपाल वाहतुकीची फेरी फक्त मध्यवर्ती बसस्थानकातून टपाल घेऊन प्रवासी चढ उतारासाठी रहाटागर बसस्थानकामध्ये नेण्यात येणार आहे. १०पासून जत, कोल्हापूर, मिरज, विजापूर, कुरुंदवाड, गडहिंग्लज, इचलकरंजी, गारगोटी, अक्कलकोट, सांगली, मिरज, लातूर, पुणे, चिंचवड, इस्लामपूर, बेळगाव, आंबेजोगाई, उस्मानाबाद, अक्कलकोट आदी गाड्या रहाटागर बसस्थानकातून सुटणार आहेत. (प्रतिनिधी)