आॅनलाईन व्यवहार करा; पण जपून
By admin | Published: January 6, 2015 09:10 PM2015-01-06T21:10:55+5:302015-01-06T21:53:22+5:30
अनेकांना गंडा : एटीएम, क्रेडिट कार्डधारकांना फटका
सुहास जाधव- पेठवडगांव -आॅनलाईन व्यवहार करणाऱ्या, तसेच ‘एटीएम’ कार्डचा पासवर्ड विचारून परस्पर पैसे चोरून नेण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिन्यात पाच ते सात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी संबंधितांच्या तक्रारी पोलिसांनी घेतल्या आहेत.विशेष म्हणजे बॅँकेची गोपनीय माहिती लुटारूंकडे कशी जाते? कार्ड नंबर, फोन नंबर कसे पोहोचतात? तसेच आॅनलाईन विद्युत, टेलिफोन बिल भरणाऱ्यांचे पैसे परस्पर कसे काढले? हे प्रश्न या निमित्ताने पुढे आलेले आहेत. वडगाव पोलीस ठाण्याची हद्द सधन आहे. येथे राष्ट्रीय बॅँकांनी जाळे विस्तारले आहे. शहराच्या तुलनेत अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न असतो. तसेच वाढता इंटरनेटचा वापर सुरू आहे. सुख-सुविधांमुळे ‘प्लास्टिक मनी’ ही संकल्पना वापरण्यात येते. प्रत्येक व्यवहारासाठी ‘एटीएम’ किंवा नेट बॅँकिंगचा वापर सुरू असतो. हीच गोष्ट चोरट्यांनी हेरून या परिसरात आर्थिक लुटीचे टार्गेट सुरू आहे.पूर्वी उच्चशिक्षितांना नेट बॅँकिंगद्वारे लुटण्याच्या घटना ताज्या आहेत. नेट बॅँकिंगमध्ये महिन्यात लुटीच्या घटना वाढल्या आहेत. परिसरातील बॅँक आॅफ इंडिया, स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड असणाऱ्या खातेदारांना याचा फटका बसला आहे. या चोरट्यांनी आॅनलाईन रिचार्ज करणाऱ्यांचे पैसे कोणतीही चौकशी न करता हडपले आहेत; तर मनपाडळे येथील एका शेतकऱ्यास नेहमीचीच थाप मारली. त्याला चारवेळा फोन केला. त्या शेतकऱ्याने विश्वास ठेवून पासवर्ड दिला आणि रक्कम गमावण्याची वेळ आली. तर अन्य एका प्रकरणात असा पासवर्ड मागून खात्यावर रक्कम लंपास करण्यात आली.
पोलीस व बॅँक प्रशासनाकडून वेळोवेळी पासवर्ड देऊ नका, असे आवाहन केले जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला गोड गोड बोलून बॅँकेतून काळजीपोटी मोबाईल केल्याचे सांगून पैसे लुटण्याचा प्रकार सुरू आहे. हे माहीत असूनही फसवले जाते.