सुटीत गिरवतायेत व्यवहारांचे धडे...
By admin | Published: May 27, 2015 12:25 AM2015-05-27T00:25:06+5:302015-05-27T01:02:02+5:30
वेळेचा सदुपयोग : विद्यार्थी बनलेत स्वावलंबी
कोल्हापूर : विद्यापीठाच्या परीक्षा संपत आल्या आहेत. सुटीची लगबग असताना, सुटीत जॉब शोधण्यासाठी काही तरुणांची धडपड सुरू आहे. सुटीतील दोन महिने काम करायचे पुढील कॉलेजसाठी पैसे जमवायचे, असा नवा ट्रेंड सध्या सर्वत्र रूजत आहे. या नव्या ट्रेंडमुळे सुटीचा सदुपयोग, तर होतोच पण विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडेही मिळतात.
सुटीत मामाच्या गावाकडे जाण्याची संकल्पना तरुणांच्या डोक्यातून केव्हाच गेली आहे. दोन-तीन महिने घरी बसून सुटी कशी घालवायचा, हा प्रश्न तरुणांना पडला असताना मुलांचा सुटीत शिबिरे, नवीन कोर्स शिकण्याकडे कल होता. यासह चित्रपट पाहणे, नदीकाठची झुळूक, डोंगरमाथ्यावरील स्वच्छ हवा आणि आमराईतली मोहरलेली सावली, अशी काहीशी संकल्पना तरुणाईची सुटीबद्दल होती.
मात्र, महिन्याला मिळणारा पॉकेटमनी नेहमी अपुरा पडतो, या पॉकेटमनीत भर घालण्यासाठी तरुणाईचा आता सुटीत जॉब करण्याकडे कल वाढत आहे. त्यामध्ये काहीजण हा जॉब गरजेपोटी करतात, काही अनुभवासाठी करतात, तर काहीजण सुुटीचा सदुपयोग करण्यासाठी करत आहेत.
या कामांतून मिळणाऱ्या पैशांतून पुढील वर्षाच्या कॉलेजचा खर्च, तर भागतोच पण त्याचसोबत कॉलेजसाठी स्वत:च्या पैशांतून
कपडे, बूट घेण्यासाठी करीत आहे. (प्रतिनिधी)
परदेशातील तरुण-तरुणी सुटीत मोठ्या प्रमाणात जॉब करतात. ही संकल्पना खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान तर असते; पण अशा समर जॉबमुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानही मिळते. त्याचा चांगला उपयोग भविष्यातील करिअरसाठी होतो. अनेक मुले कॉलेज संपल्यानंतर जॉब शोधण्यासाठी बाहेर पडतात. यावेळी मुलाखतीला सामोरे जाताना अनुभव नसल्याने ते मागे पडतात. मात्र, या अशा नोकरीतून त्यांच्या आत्मविश्वास वाढतो.
- प्रा. सागर चरापले, शहाजी कॉलेज
सध्या कॉलेजला सुट्ट्या पडल्या आहेत. सध्या एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करत आहे. त्यामुळे मला थोडे पैसे मिळतात, तसेच कामाची माहिती होत आहे. त्यामुळे सुटीचा सदुपयोग होत आहे. या पैशांतून मी माझे पुढील शिक्षण घेणार आहे.
- प्रज्योत पाटील,
कोल्हापूर