राजारामपुरीतही व्यवहार बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:38+5:302021-06-09T04:28:38+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात सरसकट सर्व दुकानांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत राजारामपुरीत आज बुधवारी दुपारी ...
कोल्हापूर : जिल्ह्यात सरसकट सर्व दुकानांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत राजारामपुरीत आज बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. या व्यवहार बंदला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला आहे.
गेली दोन महिने अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद आहेत. प्रशासनाला अनेकवेळा विनंती करूनदेखील दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने आज बुधवारी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवासहित सर्व दुकाने व व्यवहार दुपारी बारावाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत मंगळवारी झालेल्या बैठकीत राजारामपूरी व्यापारी असोसिएशनने हा बंदचा निर्णय घेतला आहे. या वेळी अध्यक्ष ललित गांधी, सचिव रणजित पारेख, संचालक रमेश कारवेकर, दीपक पुरोहित, विजय येवले उपस्थित होते. केमिस्ट असोसिएशनचादेखील या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र अध्यक्ष संजय शेटे व सचिव शिवाजी ढेंगे यांनी काढले आहे.
--