जिल्हा परिषदेच्या १०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:17+5:302021-07-23T04:16:17+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील तीन विभागांच्या १०० कर्मचाऱ्यांच्या गुरुवारी समुपदेशन प्रक्रियेद्वारे बदल्या करण्यात आल्या. परंतु अतिवृष्टीमुळे ...
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील तीन विभागांच्या १०० कर्मचाऱ्यांच्या गुरुवारी समुपदेशन प्रक्रियेद्वारे बदल्या करण्यात आल्या. परंतु अतिवृष्टीमुळे आज शुक्रवारी होणारी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यामध्ये विनंती, प्रशासकीय आणि आपसी बदल्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील बदल्यांचे नियोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्यासाठी भरपावसात बाराही तालुक्यांतून कर्मचारी उपस्थित होते. बहुतांशी कर्मचारी उपस्थित राहिल्यामुळे ही प्रक्रिया सकाळीच सुरू करण्यात आली. सकाळपासूनच अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी सभागृहात थांबून या प्रक्रियेत सहभाग घेतला. मधला काही काळ महिला आणि बालकल्याण सभापती शिवानी भोसले, शिक्षण सभापती रसिका पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यावेळी उपस्थित होत्या.
दरम्यान गुरुवारी दिवसभरामध्ये बाराही तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच अनेक रस्ते बंद झाल्याने गुरुवारची बदली प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव आणि सचिव अजित मगदूम यांनी केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष शिंपी यांच्याशी चर्चा करून शुक्रवारची बदली प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाऊस कमी झाल्यानंतर उर्वरित बदल्या करण्यात येणार आहेत.
चौकट
चित्रीकरण करणाऱ्या ग्रामसेवकाला सीईओंनी झापले
ग्रामसेवकांच्या बदल्यावेळी एक ग्रामसेवक मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी यावेळी प्रक्रिया थांबवून संबंधिताला याबाबत विचारणा केली. एक मिनिटात जे काही चित्रीकरण केले आहे ते डिलिट करा, नाही तर शिस्तभंगाची कारवाई करेन, असा इशारा दिला. त्यानंतर संबंधिताने हे चित्रीकरण डिलिट केले.
चौकट
पावसाचे पाणी सभागृहात
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये पाण्याचे लोट सुरू झाल्याने अखेर याठिकाणी स्वच्छता करणाऱ्या महिलांना दिवसभर थांबवण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारताना एका बाजूला भर टाकली गेली. परिणामी त्या बाजूने येणारे पाणी सौम्य उताराने येऊन सभागृहात शिरू लागले. सभागृहातील काही खुर्च्याही काढण्यात आल्या. दिवसभर याच ठिकाणी ही बदली प्रक्रिया सुरू होती. अखेर स्वच्छता करणाऱ्या महिलांना बोलावून त्यांच्याकडून हे पाणी पुसून आणि सुपलीने बाहेर काढण्याचे काम दिवसभर सुरू होते.
२२०७२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहामध्ये पावसाच्या पाणी शिरल्याने अशा प्रकारे स्वच्छता कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.