पदाधिकाऱ्यांच्या शिपाई, स्वीय सहायकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:20+5:302021-07-01T04:18:20+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्याकडील स्वीय सहायक आणि शिपायांच्या मूळ ठिकाणी बदल्या ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्याकडील स्वीय सहायक आणि शिपायांच्या मूळ ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु याबाबतच्या आदेशांमध्ये संभ्रम असल्याने पुन्हा आहे तिथे बदली करून देतो असे सांगत जोडण्या लावत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.
एरवी जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात दीड महिना या सर्वांना मूळ ठिकाणी काम करण्यास सांगितले जाते. पदाधिकारी बदलाच्या काळात अशा बदल्या केल्या जात नाहीत. परंतु यावेळी मात्र तसे आदेश काढण्यात आले आहेत. यात शिपायांना मूळ ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले असून स्वीय सहायकांना मूळ काम करून अतिरिक्त जबाबदारी सध्याचीही जबाबदारी पार पाडण्यास सांगण्यात आले आहे.
पदाधिकाऱ्यांचा स्वीय सहायक होण्यासाठी अनेकदा चढाओढ असते. तसेच शिपाई म्हणूनही काम करण्यास काहीजण प्राधान्य देतात. इतर ठिकाणी शिपाई म्हणून काम करताना पूर्ण वेळ काम असते. परंतु अनेकदा पदाधिकाऱ्यांच्या येथे काम करताना ते आल्यानंतरच काम लागते. इतरवेळी थोडा निवांत वेळ मिळतो.
विभागात काम करणे आणि पदाधिकाऱ्यांकडे काम करणे याचे अन्य फायदेही असतात. त्यामुळेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या काळातही आपली वर्णी लागावी यासाठी काहीजण धडपडत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत पहावयास मिळत आहे. यासाठी काही जणांनी इच्छुकांना हमी दिली असून त्यानुसार जोडण्या घातल्या जात आहेत.