रूपांतरित कराच्या तक्रारींची बुट्टी तहसीलमध्ये

By Admin | Published: March 1, 2016 12:39 AM2016-03-01T00:39:23+5:302016-03-01T00:43:17+5:30

शिवसेनेचा अभिनव मोर्चा : कर न भरण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार; कायद्यातील तरतुदींनुसार नोटीस : खरमाटे

In Transit complaints booth tehsil | रूपांतरित कराच्या तक्रारींची बुट्टी तहसीलमध्ये

रूपांतरित कराच्या तक्रारींची बुट्टी तहसीलमध्ये

googlenewsNext

कोल्हापूर : रुपांतरित कराच्या नोटिसीतील त्रुटींबद्दल तक्रारी द्याव्यात या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहर शिवसेनेच्यावतीने सोमवारी दुपारी बुट्टीभर लेखी तक्रारींचे गठ्ठे वाजत-गाजत करवीर तहसीलदारांकडे मोर्चाने सुपूर्द केले. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर शहरातच अशा पद्धतीने रुपांतरित कराच्या नोटिसा महसूल खात्यामार्फत लागू केल्या आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिक व व्यापाऱ्यांनी, महिलेने डोक्यावरील लेखी तक्रारींचे गाठोडे भरलेली बुट्टी घेऊन वाजत-गाजत मोर्चा काढला. तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्या टेबलवर ही तक्रारींची बुट्टी ठेवून हा रुपांतरित कर न भरण्याचा निर्धार केला.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस व शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. मोर्चात शिवसैनिकांसह कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे पदाधिकारी, हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी तसेच व्यापारी सहभागी झाले होते. तहसीलदार योगेश खरमाटे यांनी, केंद्र सरकारकडून असा कोणताही अध्यादेश आला नसून कायद्यातील तरतुदीनुसार १९६६ अंतर्गत ही वसुलीची तरतूद केल्याचे सांगितले.
येथील टाऊन हॉल उद्यान येथून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शिवाजी चौकातून करवीर तहसीलदार कार्यालयावर आला. मोर्चात रूपांतरित करांबाबत लेखी तक्रारींची भरलेली बुट्टी महिलेने डोक्यावर घेतली होती. बुट्टीवर ‘कराचा भार आता सोसवेना?’ असा उल्लेख केला होता. तहसीलदार कार्यालायासमोर निदर्शने झाली. त्यानंतर तहसीलदार खरमाटे यांच्यासमोर टेबलवर ही तक्रारींची बुट्टी ठेवली. पाठविलेल्या नोटिसा अन्यायकारक असल्याबाबत शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस यांनी विवेचन केले. मोर्चात गटनेते नियाज खान, रवी चौगुले, विनायक साळोखे, राजू नागवेकर, सुजित साळोखे, अभिजित साळोखे, शशी बिडकर, महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, कमलाताई पाटील, तसेच कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, उमेश राऊत, सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, संजय शेटे, उज्ज्वल नागेशकर, नयन प्रसादे, अरुण चोपदार, राजेंद्र माळकर, मोहन पाटील आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)

प्रथम महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वसुली करा
शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागाकडून ही रूपांतरित कराची वसुली होत असेल तर त्यासाठी प्रथम महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातून वसुलीला प्रारंभ करावा, नंतर कोल्हापूरचा विचार करावा, त्यामुळे आम्ही हा रूपांतरित कर भरणार नसल्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.

Web Title: In Transit complaints booth tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.