शाळांमधील परिवहन समित्या कागदावरच
By admin | Published: August 14, 2015 11:13 PM2015-08-14T23:13:30+5:302015-08-14T23:13:30+5:30
महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक
देवाळे : पन्हाळा तालुक्यातील देवाळे, कसबा सातवे, बोरपाडळे, मोहरे, वारणा-कोडोली, सातवे-सावर्डे, आमतेवाडी-शिंदेवाडी, माळवाडी, कोतोली, पन्हाळा, वाघबीळ येथील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संस्थेची मर्यादा लागू असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सुसाट वेगाने धावणारी वाहने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर परिवहन समित्या स्थापन करण्याचा आदेश मात्र कागदावरच आहे.
पालकांना भाडे परवडत नसल्याने खर्चाशी मेळ घालण्याच्या हेतूने वाहनधारक विद्यार्थ्यांना वाहनामध्ये अक्षरशोंबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वाहनांचे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. पालक खर्च वाचविण्यासाठी पाल्याचा जीव धोक्यात घालत आहेत. तसेच महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. शहर, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग आणि नगरपालिका क्षेत्रातील शिक्षक मंडळावर असते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर विद्यार्थ्यांच्या संख्येचे बंधन घालून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील अशी तरतूद करावी, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)