खबऱ्याची टीप मिळताच सापळा! चार दुचाकीसह चोरटा जाळ्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
By सचिन भोसले | Published: January 12, 2024 07:06 PM2024-01-12T19:06:41+5:302024-01-12T19:07:01+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्यास तपोवन मैदानाजवळील शाळेजवळ गुरुवारी अटक केली.
कोल्हापूर: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरट्यास तपोवन मैदानाजवळील शाळेजवळ गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या. दिगंबर संभाजी माने (वय ३४, रा. गरजे मळा, आळते, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानूसार शाखेकडून विविध पथके तयार करण्यात आली.
त्यानुसार पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांनी गुप्त खबऱ्याद्वारे माहिती मिळाली. त्यानूसार दिगंबर माने हा चोरीची मोटारसायकल घेवून कळंबा रोडवरील तपोवन मैदानालगतच्या शाळेजवळ येणार असल्याचे समजले. त्यानूसार सापळा रचून त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अधिक चौकशीत मोटरसायकल चोरीची असल्याचे समोर आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर ही मोटरसायकल लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. आणखी चौकशीअंती त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या चार मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या. या सर्व मोटरसायकली लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. संबधित आरोपीस पुढील कारवाईकरीत लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, अमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, सागर माने, विनोंद कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली.