दारू तस्करी रोखण्यासाठी ट्रॅप
By admin | Published: February 14, 2017 12:08 AM2017-02-14T00:08:01+5:302017-02-14T00:08:01+5:30
३५० कर्मचारी तैनात : विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांची माहिती
एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या सीमेवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे तापू लागले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. गोव्याहून विदेशी दारू छुप्या मार्गाने वाहतूक करून उमेदवारांच्या पंटरांनी गल्ली-बोळांत, गावा-गावांत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. गतवर्षीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी झाली होती. यंदाही दारूचा महापूर मोठ्या प्रमाणात वाहण्याची शक्यता असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागासमोर आहे.
कोल्हापूरवर विशेष लक्ष
जिल्ह्यात दारूचे चार कारखाने आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरात मार्केट यार्ड येथे दोन, तर कबनूर (ता. कागल) येथे दोन आहेत. यामध्ये होलसेल विक्रेते १५, किरकोळ विक्रेते आठ आहेत. येथून ही दारू कोल्हापूरसह सांगली, सातारा याठिकाणी विक्रीसाठी जाते. जिल्ह्यात परवानाधारक सुमारे ३२५ देशी दारूची दुकाने, तर ३५० बीअर बार आहेत. त्यानुसार महिन्याला नऊ लाख लिटर दारूची विक्री केली जाते. यापेक्षा जास्तीत-जास्त ३० टक्केदारूची विक्री वाढल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेषत: गोव्याहून तस्करी होण्याची शक्यता असल्याने तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा हे पाच तपासणी नाके सील केले आहेत.