सीपीआरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ट्रामा केअर सेंटर

By admin | Published: March 11, 2017 12:32 AM2017-03-11T00:32:33+5:302017-03-11T00:32:33+5:30

रामानंद यांची माहिती : उच्च दर्जाची यंत्रे, सुसज्ज व्यवस्थेसह न्यूरो सर्जनचीही नियुक्ती करण्यात येणार

Trauma Care Center on experimental basis in CPR | सीपीआरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ट्रामा केअर सेंटर

सीपीआरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ट्रामा केअर सेंटर

Next


कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. उच्च दर्जाची यंत्रे आणि सुसज्ज व्यवस्था या सेंटरमध्ये असून लवकरच न्यूरोसर्जन याठिकाणी नियुक्त करणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रामानंद म्हणाले, सीपीआरमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ८० लाख रुपये उपलब्ध करून दिले. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक आदींनी प्रयत्न केले. आता एक महिना हे सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी सुरू राहील. या सेंटरमध्ये २० बेडची (कॉट) व्यवस्था असून दहा बेड हे अतिदक्षता विभागासाठी तसेच स्त्री व पुरुष विभागात प्रत्येकी पाच असे एकूण दहा बेड आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक पद्धतीचा शस्त्रक्रिया विभाग (आॅपरेशन थिएटर) करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांच्या मानाने सीपीआरमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. नऊ सर्जन, आठ वैद्यकीय अधिकारी, २० नर्सेस असे मनुष्यबळ या विभागासाठी कार्यरत आहे तसेच न्यूरोसर्जनसाठी बंगलोर येथील अनिल जाधव यांनी अर्ज केला असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.
यावेळी डॉ.व्ही. ए. देशमुख, डॉ. मिसाळ, अभ्यागत समितीचे महेश जाधव, सुनील करंबे, डॉ. अजित लोकरे, डॉ. सुरेखा बसरगे, डॉ. इंद्रजित काटकर आदी उपस्थित होते.


अतिक्रमण १५ दिवसांत काढणार...
सीपीआरच्या आवारात चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. त्यामुळे आवारात अतिक्रमण वाढले आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबधितांना अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत येथील पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले जाईल, असे अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
न्यूरोसर्जनची नियुक्ती करा : क्षीरसागर
सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये तत्काळ न्यूरोसर्जनची पदनिर्मिती करून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे पत्रक क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Web Title: Trauma Care Center on experimental basis in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.