कोरडवाहू ‘बेनिक्रे’चा बागायतीकडे प्रवास
By admin | Published: April 24, 2017 11:38 PM2017-04-24T23:38:59+5:302017-04-24T23:38:59+5:30
वेदगंगेतून पाणी योजनेची स्वप्नपूर्ती : ६०० एकर जमीन ओलिताखाली, आज पाणी पूजनास सर्वच नेतेमंडळींची उपस्थिती
दत्तात्रय पाटील --म्हाकवे --गावकऱ्यांचा एकोपा, एकसंधपणा, ध्येयासक्तीची पूर्ती आणि प्रचंड श्रण उपसण्याची तयारी असेल तर आपले भाग्य आपणच कसे बदलू शकतो याची प्रचिती कागल तालुक्यातील बेनिक्रे येथील गावकऱ्यांनी दाखवून दिली आहे.
येथील ४५० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या जमिनीचा तुकडा बँकेला गहाण ठेवून वेदगंगा नदीतून डोंगर कपारीतील बेनिक्रे येथे पाणी योजनेचे चार वर्षांपूर्वी स्वप्न पाहिले. पाणी योजनेच्या पूर्ततेच्या माध्यमातून त्यांच्य स्वप्नवेलीवर आज गोंडस फुले उमलत आहेत. आज, मंगळवारी दुपारी २ वाजता कागल तालुक्यातील सर्व पक्ष व गट-तटाच्या प्रमुख नेतेमंडळींच्या आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या पाणी योजनेचे पाणीपूजन व कृतज्ञता सोहळा होत आहे. पाण्याचे दुर्भीक्ष असणाऱ्या या गावातील १०० टक्के जमीनही ओलिताखाली येणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अखंडीतपणे परिश्रम घेऊन कर्जाचे व्याज दरवर्षी वाढतच जात असल्याची जाणीव असणाऱ्या शेतकऱ्यांनी ही पाणी योजना मार्गी लावली.
२०१३ मध्ये येथील ४५० शेतकऱ्यांनी झपाटल्याप्रमाणे आपल्या गावची सर्व जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार केला. या योजनेच्या पूर्ततेसाठी कोणत्याही शासकीय निधीशिवाय या शेतकऱ्यांनी आपल्या स्वमालकीची जमीन बँकेकडे गहाण ठेवून सव्वा तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज घऊन त्यांनी गावच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगरापलीकडून बारमाई वाहणाऱ्या वेदगंगा नदीतून पाणी योजनेचे ‘शिवधनुष्य’ उचलले.
सुरुपली येथून बेनिक्रे गावच्या पश्चिमेला असणाऱ्या लघुपाटबंधारे प्रकल्पात टाकून तेथून गावाला पिण्यासह शेतीला देण्याचे नियोजन केले. सुमारे अडीच किलो मीटर अंतर आणि दीड फूट (१८ इंच) पाणी योजनेच्या कामाला सुरुवातही अत्यंत जलद गतीने झाली. मात्र, गावच्या उत्तरेकडील बाजूला वनविभागाच्या मालकीचे क्षेत्र येते. त्यामुळे या ठिकाणी खुदाई करण्यासाठी केंद्रीय वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक बनले. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे आवाहन उभे झाले. तब्बल दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही परवानगीही मिळून या कामाची पूर्तता झाली.
शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या जलपूर्तीसाठी ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही परिश्रम घेतले. यामध्ये अध्यक्ष आण्णासाहेब वाडकर, उपाध्यक्ष गणपती इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवि पाटील, वसंत जाधव, हिंदुराव काळुगडे, यासिन
देसाई, आण्णासो जाधव, सचिव
रवींद्र पाटील, आदींचा यामध्ये मोलाचा वाटा आहे.
येत्या वर्षभरात बेनिक्रे १०० टक्के बागायती
ऐन उन्हाळ्यामध्ये चिकोत्रा खोऱ्यासारख्या अवर्षणग्रस्त भागात येणाऱ्या बेनिक्रे गावाला पिण्याच्याही पाण्याचे दुर्भीक्ष होते. मात्र, वेदगंगतून थेट तलावामध्ये पाणी योजना केल्यामुळे येथील पिण्यासह शेतीचा पाणीप्रश्न मिटणार आहे.
सुमारे दीड हजार एकर जमीनीपैकी सध्या ६०० एकर जमीन बागायती झाली असून, आगामी वर्षभरात संपूर्ण जमीन ओलिताखाली येईल, असा अंदाज ज्योतिर्लिंग पाणी संस्थेच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.