धोंडेवाडी ते केकतवाडी पायवाटेनेच प्रवास
By admin | Published: June 16, 2016 12:19 AM2016-06-16T00:19:20+5:302016-06-16T01:00:41+5:30
दऱ्या-खोऱ्यांतून वाट : स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांनंतरही वनवासच; ना रस्त्याचे रुंदीकरण ना डांबरीकरण
शिवराज लोंढे --सावरवाडी --सातेरी-महादेव डोंगरी पर्वतरांगा, दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेला प्रदेश, स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांत ना रस्त्याचे रुंदीकरण ना रस्त्याचे डांबरीकरण. दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या अजून पायवाट ही पाचवीला पूजलेली आहे. दऱ्या-खोऱ्यातून, काटेरी वनातून ग्रामस्थांना पाऊलवाटेनेच ये-जा करण्यात सारे आयुष्य वेचावे लागते. करवीर तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागातील धोंडेवाडी ते केकतवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था काटेरी बनली आहे. पाऊलवाटेतूनच वाहतूक करावी लागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दळणवळणाचा प्रश्न धोंडेवाडी, केकतवाडी गावांचा सुटलेला नाही. केवळ मतांसाठी उपयोग करणाऱ्या कोणत्याच राजकीय नेत्यांनी धोंडेवाडी-केकतवाडी गावांना जोडणाऱ्या डोंगरी भागातील रस्त्याचे अद्याप रुंदीकरण व डांबरीकरण केलेले नाही. दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही साधी खडीही पडलेली नाही. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान चार किलोमीटर अंतरावरील रस्ता म्हणजे काटेरी पाऊलवाट आहे. डोंगरी भागातील महिला, पुरुष, विद्यार्थी यांना काटेरी पाऊल वाटेनेच ये-जा करावी लागते.डोंगरी भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे. दऱ्या-खोऱ्यांतून जाणाऱ्या या रस्त्यावरीलओढ्यावर मोरीचे अद्याप बांधकाम झालेले नाही. दोन्ही गावांतील ग्रामस्थांना गावांकडे ये-जा करण्यासाठी पाऊलवाटेचा जन्मभर आधार घ्यावा लागला. निवडणुका आल्या की, आश्वासन देणारे नेतेमंडळी मात्र निवडणुकीनंतर या डोंगरी परिसराला विसरतात हे अनेक वर्ष सत्य आहे. केवळ मतासाठी वापर करणाऱ्या नेत्यांनी मात्र दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे अद्याप दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. शाळकरी विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी डोंगरी पाऊलवाटेनेच दररोज ये-जा करावी लागते.धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण कधी होणार या प्रश्नाकडे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. डोंगरी लोकांना काटेरी पाऊलवाटा मात्र पाचवीलाच पूजलेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास कधी होणार, डोंगरी रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार यासारख्या प्रश्नांची समस्या कधी उलगडणार हा मुख्य हेतू आहे.
धोंडेवाडी ते केकतवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अद्याप रुंदीकरण, डांबरीकरण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे डोंगरी लोकांचे हाल होऊ लागले आहेत. रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होणे गरजेचे आहे.
- रामभाऊ नलवडे, सामाजिक कार्यकर्ते
दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोणीच लक्ष दिलेले नाही. पाऊलवाटेने नागरिकांना ये-जा करावी लागते. रस्ता होणे गरजेचे आहे.
- सरदार नलवडे,
काँग्रेस (आय) कार्यकर्ते
पाणी आल्यावर वाट बंद
दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या डोंगरी भागातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी दरम्यान दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे अजून रूप पालटलेले नाही.
भल्या मोठ्या शिळा अन् काटेरी झुडपातून गेलेल्या पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना आपला चरितार्थ चालवावा लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेल्या ६९ वर्षांत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
मोठमोठ्या दगडी शिळेवरून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात दरीतील पाणी ओढ्यावर आले की, हा मार्ग बंद असतो. त्यामुळे अन्य रस्त्याने दोन्ही गावांना जावे लागते.