तेरा दिवसांत १४०० जणांचा प्रवास; मुंबई-कोल्हापूर विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:39 AM2019-09-20T00:39:47+5:302019-09-20T00:39:51+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून आजअखेर १३ दिवसांमध्ये एकूण १४०० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ट्रू-जेट कंपनीने ७० आसनी विमानाच्या माध्यमातून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू केली. मुंबईहून दुपारी साडेबारा वाजता सुटणारे विमान कोल्हापुरात दीड वाजता येते. येथून दुपारी एक वाजून ५० वाजता निघणारे विमान मुंबईत दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू आहे. या विमानसेवेची वेळ दुपारची असली, तरी प्रवाशांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज सरासरी १०० जण ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ मार्गावर प्रवास करतात. त्यामध्ये ५० टक्के प्रवासी हे कोल्हापूरचे असून उर्वरित इचलकरंजी, सांगली, कºहाड, सातारा, आदी परिसरांतील आहेत. काही प्रवासी कोल्हापूरहून अहमदाबाद, इंदोर, हैदराबाद या राज्यांसह जपान, युरोपीयन देशांची कनेक्टिंग फ्लाईट घेत आहेत. तिरूपती-कोल्हापूर-हैदराबाद आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवरील सेवांपाठोपाठ मुंबई-कोल्हापूर मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी आवश्यक असणाºया सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.