चालाकची हुशारी बेतली प्रवाशांच्या जीवावर; पूरात अडकली ट्रॅव्हल्स, ग्रामस्थांनी वाचवले चौदा जणांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:04 AM2021-07-23T11:04:11+5:302021-07-23T11:04:22+5:30
Travels stuck in flood: चालकाने पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेने गाडी महापुरात घातली.
पांगिरे : पांगिरे (ता. भुदरगड) येथील नदीला आलेल्या पुरात ट्रॅव्हल्स वाहून गेल्याची घटना घडली आहे. पण, प्रसंगावधान साधून गावातील लोकांनी ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या चौदा जणांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. चालकाच्या बेफिकीर वृत्तीमुळे चौदा जणांच्या जीवावर बेतले होते, केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.
नाशिकमधील सावतामाळी ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स(GJ 14 Z 2370) ही गोवा येथून नाशिककडे चालली होती. पांगीरे येथे नदीला महापूर आल्याने त्या गावातील तरुणांनी रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रस्ता बंद केला होता. रात्री बारा वाजेपर्यंत हे तरुण रस्त्यावर होते. पहाटे तीन च्या सुमारास ही ट्रॅव्हल्स पांगीरे येथे आल्यावर चालकाने पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेने गाडी महापुरात घातली. गाडी मध्यभागी आल्यावर पाण्याचा दाब वाढल्याने गाडी अडकली.
सर्व प्रवाशांना गावातील दत्त मंदिरात ठेवले आहे.
गाडीत असलेल्या प्रवाशांनी जोरात ओरडायला सुरवात केली. पाण्याचा दाब जास्त असल्याने त्यांना चालतही बाहेर जाता येत नव्हते. अखेर या गावातील दिगंबर पाटील यांना गाडीतील प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्या तरुणाने प्रसंगावधान राखून तातडीने गावातील अमोल चव्हाण, निलेश भराडे यांना फोन केले. त्यांनी अनेकांना फोन करुन नदीवर बोलावले.
यानंतर गावातील ग्रामस्थानी ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु केले. पाण्याचा वेग खूपच होता त्यामुळे ट्रॅव्हल्स जवळ जाणे सोपे नव्हते. यावेळी अलीकडे मालवाहू ट्रक उभा होता, त्या ट्रकला वायर रोप बांधून गावातील तरुण ट्रॅव्हल्स जवळ गेले. यानंतर ट्रॅव्हल्समधील लोकांना रोपच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.
पावसाच्या वाढत्या जोरामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होता. यावेळी ट्रॅव्हल्स मध्ये अकरा प्रवासी आणि तिघे चालक-वाहक असे एकूण चौदा लोक होते. ग्रामस्थांच्या सहकर्यामुळे सर्वांचे जीव वाचले. यावेळी भैरू चव्हाण, अमोल चव्हाण, निलेश भराडे, दिगंबर पाटील, निखिल भराडे, अमोल हसुरकर, संकेत बोरनाक, नामदेव गडकरी, कंटेनर चालक, ग्रामस्थ आणि गावातील युवक या सर्वांनी पुरच्या पाण्यात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सर्वांना वाचवले.