Kolhapur Crime: उसनवार घेतलेल्या साडेबारा लाखांसाठी पळवली ५० लाखांची ट्रॅव्हल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:58 PM2023-02-27T13:58:15+5:302023-02-27T13:58:42+5:30
पैसे परत मिळाल्याशिवाय ट्रॅव्हल्स देणार नाही, असे सांगून धमकावले
कोल्हापूर : हातउसने घेतलेले साडेबारा लाख रुपये वेळेत परत न दिल्याने थेट ५० लाखांची ट्रॅव्हल्स ओढून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. हा प्रकार २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घडला. ट्रॅव्हल्स व्यावसायिक सिकंदर आप्पालाल पठाण (वय ५३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार मिलिंद देशपांडे (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदर पठाण हे खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. त्यांनी गेल्या काही महिन्यांत इस्लामपूर येथील मिलिंद देशपांडे यांच्याकडून हातउसने साडेबारा लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत मिळावेत, यासाठी देशपांडे यांच्याकडून तगादा सुरू होता. मात्र, वेळेत पैसे परत मिळत नसल्याने तुमची ट्रॅव्हल्स ओढून नेऊ, अशी धमकी देशपांडे यांनी वेळोवेळी दिल्याचे पठाण यांनी सांगितले.
पठाण यांनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील रिकाम्या जागेत पार्क केली होती. शनिवारी सकाळी त्यांची ट्रॅव्हल्स मिलिंद देशपांडे यांच्या सांगण्यावरून अनोळखी दोघांनी पळवून ती कामेरी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील त्यांच्या पेट्रोलपंपावर लावल्याची माहिती पठाण यांना मिळाली.
पठाण यांनी शनिवारी दुपारी जाऊन देशपांडे यांच्याकडे ट्रॅव्हल्सची मागणी केली. मात्र, माझे पैसे परत मिळाल्याशिवाय ट्रॅव्हल्स देणार नाही, असे सांगून धमकावले. याबाबत पठाण यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कामेरी येथील पेट्रोलपंपावरून ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली.