अन्य राज्ये, जिल्ह्यातील ५६७४ कोरोना रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:31+5:302021-05-20T04:26:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रामध्ये समोर आलेला रुग्ण कोणत्या जातीचा, प्रांताचा आहे हे पाहिले जात नाही. तो समोर आल्यानंतर त्याची आरोग्यविषयक समस्या दूर करणे एवढेच कार्य डॉक्टर जाणत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी हीच कामगिरी करत गतवर्षीपासून अन्य राज्यातील आणि जिल्ह्यातील ५ हजार ६७४ कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. कर्नाटकातील सर्वाधिक म्हणजे २२३८ रुग्णांवर कोल्हापुरात उपचार झाले आहेत. एकूण रुग्णांच्या ६.२३ टक्के रुग्ण हे अन्य राज्ये व जिल्ह्यातील आहेत.
कोल्हापूर जिल्हा हा विभागीयदृष्ट्या कर्नाटक आणि गोव्याला अतिजवळचा आहे. तसेच नोकरी, उद्योग आणि व्यवसाय यामुळे कोल्हापूर हे शहर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव या जिल्ह्यांशी दैनंदिन संपर्कातील आहे. अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक होण्यासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कोल्हापुरात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे.
सर्वसामान्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णसेवेचा अनुभव घेतल्यामुळे आपल्या आई-वडिलांपासून ते सासू-सासरे, मेव्हण्यापर्यंतच्या कोरोना रुग्णांवर येथे उपचार करून घेतले आहेत. उद्योग व्यावसायिकांनीही आपल्या नातेवाइकांसह मित्रांना कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केल्याचे दिसून येते. अनेक परराज्यातील कामगार कोल्हापुरात स्थायिक झाल्याने त्यांची नोंद या जिल्ह्यात अन्य राज्यातील किंवा जिल्ह्यातील म्हणून झाली आहे.
कोल्हापूर शहरामध्ये सुसज्ज अशी १०० हून अधिक रुग्णालये आहेत. सीपीआर, आयएमजी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कणेरी मठावरील रुग्णालय अशी नावाजलेली शासकीय आणि विश्वस्त रुग्णालयेही आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्याबरोबरच अन्य जिल्हे आणि राज्यातील रुग्ण उपचारासाठी कोल्हापुरातच दाखल झाले आहेत. काही जण त्या त्या वेळी कामानिमित्त आले असताना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार करण्यात आले.
चौकट
राज्य, जिल्हा कोरोना रुग्ण
कर्नाटक २२३८
सांगली ९५५
सिंधुदुर्ग ५६४
सातारा ३२४
रत्नागिरी २८०
पुणे २७५
मुंबई २२८
सोलापूर १६६
बिहार ३७
उत्तर प्रदेश ३०
राजस्थान १७
गुजरात १३
इतर ३७२
अन्य कमी रुग्णसंख्या
एकत्र करून एकूण ५६७४
चौकट
अन्य राज्ये, जिल्ह्यातील ३९५ मृत्यू
सांगली ११२
कर्नाटक ९३
रत्नागिरी ४२
सातारा ४१
सिंधुदुर्ग ३८
पुणे १७
सोलापूर १७
मुंबई १३
लातूर ०२
नाशिक ०१
रायगड ०१
तामिळनाडू ०१
राजस्थान ०१
गुजरात ०१
एकूण ३९५
कोट
डॉक्टर हे केवळ रुग्णावर उपचार करणे जाणतात. सीपीआर, इचलकरंजी येथील आयजीएम आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कर्नाटकातील अनेक रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी गेले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये आरोग्य सेवा चांगली असल्याने अन्य जिल्ह्यांतील रुग्ण उपचारास प्राधान्य देत आहेत.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर