‘सम्राट’वर होणार आता चेन्नईत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:39 AM2018-05-15T00:39:24+5:302018-05-15T00:39:24+5:30
कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीअभावी योग्यवेळी उपचार न केल्याने दृष्टीहीन बनलेल्या सम्राट युवराज पोळ या चारवर्षीय मुलावर चेन्नई येथील शंकर नेत्रालय या अत्याधुनिक रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून, आज, मंगळवारी त्याचे नातेवाईक व भाजपचे कार्यकर्ते त्याला घेऊन चेन्नईला रवाना होत आहेत.
सम्राट पोळ याच्या जीवनात गरिबीमुळे आलेल्या अंधकाराबद्दलची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच समाजातील अनेक व्यक्तींनी त्याच्यावरील उपचारास आर्थिक मदत करण्याची तयारी दाखविली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर सर्व खर्च करण्याची तयारी दर्शविली. एवढेच नाही तर चेन्नईसारख्या शहरात त्याला न्यावे लागले तरी तेथे नेऊन उपचार केले जातील, अशी ग्वाही दिली होती.
पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ‘सम्राट’च्या डोळ्यांच्या तपासण्या येथील डॉ. अतुल जोगळेकर यांच्याकडे करण्यात आल्या. त्यावेळी एका डोळ्याने दिसण्याची शक्यता नाही; परंतु उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास दिसण्याची शक्यता असून, तो प्रयोग करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय डॉ. जोगळेकर यांनी दिला होता. दरम्यानच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहायक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीही त्याचे अहवाल पडताळून त्याला दिसण्याची संधी नाही, असे सांगितले होते.
मात्र, डॉ. जोगळेकर यांच्या सल्ल्यानुसार सम्राटला चेन्नई येथील शंकर नेत्रालय येथे दाखल करण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप कार्यकर्ते विजय जाधव यांनी घेतला. तेथील डॉक्टरांची गुरुवारी वेळ मिळाली आहे. त्यानुसार आज, मंगळवारी त्याला चेन्नईला नेण्यात येत आहे. त्याच्यासोबत त्याचे वडील युवराज, आजी मंगल व भाजपचे कार्यकर्ते सुनील चव्हाण जाणार आहेत.
चव्हाण यांना या नेत्रालयातील डॉक्टरांचा परिचय असून, पालकमंत्र्यांच्यावतीने तेच रुग्णांना मार्गदर्शन करण्याचे काम पाहतात.