धावत्या दुचाकीवर झाड कोसळून २ वर्षात चौघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:15+5:302021-06-19T04:16:15+5:30
राम मगदूम। गडहिंग्लज : सावली देणारी झाडेच काळ ठरत आहेत. धावत्या दुचाकीवर झाड पडून गडहिंग्लज तालुक्यात २ वर्षांत चौघांचा ...
राम मगदूम। गडहिंग्लज :
सावली देणारी झाडेच काळ ठरत आहेत. धावत्या दुचाकीवर झाड पडून गडहिंग्लज तालुक्यात २ वर्षांत चौघांचा बळी गेला. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित खात्याने पावसाळ्यापूर्वी पाहणी करून अशी धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.
उन्हाळ्यात पादचा-यांना सावली मिळावी आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. परंतु, पावसाळ्यात वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे जीवित व वित्तहानी होत आहे. १६ मे २०१९ रोजी गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर महागाव येथे हॉटेल अनिकेतजवळ रस्त्याच्या बाजूला असणारे नीलगिरीचे झाड अचानक उन्मळून पडले. त्यात मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सतीश तुकाराम कांबळे (वय ५८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यांच्या गाडीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी सुदैवाने बचावल्या. मुत्नाळ येथील विवाहित मुलीला भेटून घरी परताना ही दुर्घटना घडली. ३१ मे २०१९ रोजी नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील माजी सैनिक दादासाहेब घोरपडे व त्यांची पत्नी गीता हे दोघेही बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलाचा निकाल आणायला गडहिंग्लजला आले होते. गडहिंग्लजहून गावी परत जात असताना गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर हेब्बाळनजीक रस्त्याच्या बाजूला असलेले गुलमोहरचे झाड त्यांच्या दुचाकीवर उन्मळून पडले. झाडाची फांदी डोक्यावर जोरात आपटल्यामुळे गाडीवर मागे बसलेल्या गीता यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शुक्रवार, १८ जून २०२१ रोजी गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेल सूर्यानजीक नातवाच्या धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या सोनाबाई जाधव (लिंगनूर काानूल, ता. गडहिंग्लज) आणि त्यांचा नातू सतीश शिंदे (अत्याळ, ता. गडहिंग्लज) यांचा दुर्देैर्वी अंत झाला. या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा असणा-या धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
--------------------------------
* प्रतिक्रिया
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गडहिंग्लज शहराच्या हद्दीतील धोकादायक झाडे व फांद्या काढल्या जातात. सूर्या हॉटेलनजीकचे ते झाड धोकादायक नव्हते. तरीदेखील अचानकपणे उन्मळून पडल्याने दुर्घटना घडली आहे.
- नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, गडहिंग्लज.
--------------------------------
* संकेश्वर ते बांदा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. गडहिंग्लज येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील धोकादायक झाडे रितसर परवानगीने हटविण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.
- राहुल माळी, प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडहिंग्लज