धामोड कोते आश्रमशाळेच्या नर्सरीतील वृक्षांची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:16+5:302021-06-04T04:19:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : कोते (ता. राधानगरी ) येथे आदिवासी विकास महामंडळाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत असून, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : कोते (ता. राधानगरी ) येथे आदिवासी विकास महामंडळाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत असून, या ठिकाणी पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. येथील शाळा व्यवस्थापनाकडे गट नंबर ४४८ मधील १५ हेक्टर जमीन वापरात आहे. या शाळेने या जमिनीवर लागवड केलेले वृक्ष जीर्ण झाले असून, पैकी तेराशे जीर्ण वृक्ष तोडण्याची परवानगी एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाने दिली आहे. त्याजागी नवीन वृक्षांचे संगोपन करण्याचेही या आदेशात नमूद केले आहे.
येथील शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळे सभोवतालच्या वनीकरणातील जीर्ण झालेल्या झाडांची तोड करण्याच्या अनुषंगाने १७ डिसेंबर २०२० रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाकडे शाळा आवारातील जीर्ण झालेल्या वृक्षांची तोड करण्याची मागणी केली होती . तसेच झाडे जीर्ण असल्याबाबतचा परिक्षेत्र वन अधिकारी वनविभाग राधानगरी यांचा मूल्यमापन अहवाल सोबत जोडला होता.
त्यानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. पांढुरे यांनी सदर वनीकरणातील तेराशे जीर्ण वृक्षांची तोड करण्याचे आदेश १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दिले. त्यानंतर मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी निविदा मागवून जय मल्हार टिंबर्सचे प्रोप्रायटर मधुकर चौगुले यांना हे काम दिले. प्रतिनग ३७० रुपये प्रमाणे १३०० जीर्ण वृक्षांची ४८१००० रुपयाची रक्कम भरून घेतली. पैकी दहा टक्के रक्कम सामाजिक वनीकरण विभाग राधानगरी यांच्याकडे भरल्यानंतर रीतसर झाड तोडीला परवानगी मिळाली. सध्या या नर्सरीतील जीर्ण झालेले, कीड लागलेली, पडझड झालेल्या वृक्षांची तोड सुरू असून, ४७० ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीचे जीर्ण वृक्ष तोडले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची अटही या आदेशात घालण्यात आली आहे.
प्रतिक्रिया - शाळेच्या परिसरातील नर्सरीमध्ये मुलांची सतत वर्दळ, ये-जा व खेळण्या-बागडण्याचे काम सुरू असते. नर्सरीतील झाडे खूपच जीर्ण झाली असून, विद्यार्थांच्या सुरक्षितततेच्या कारणास्तव या झाडांच्या तोडीचा प्रस्ताव केला होता. मंजुरी घेऊनच रीतसर तोड सुरू केली आहे.
- डी. पी. पाटील, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, कोते