राधानगरीतील सावकाराच्या घराची ‘सहकार’कडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:00 PM2020-03-13T13:00:41+5:302020-03-13T13:01:45+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी सहकार खात्याच्या पथकाने राधानगरीतील अवैध सावकार ...
कोल्हापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी सहकार खात्याच्या पथकाने राधानगरीतील अवैध सावकार मनोहर पोवार यांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची झाडाझडती घेतली. यात आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. साहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी मोहीमच उघडली आहे. कार्यालयाकडे येणाºया प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जात आहे. राधानगरी येथील मनोहर पोवार यांच्याविषयीही अशाच तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यांची दखल घेत गुरुवारी पथकाने अचानकपणे घरावर छापा टाकत कागदपत्रे ताब्यात घेतली.
यात कच्च्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या, कोरे व लिखित चेक, हस्तलिखित बॉँड, इतर व्यक्तींचे बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, तक्रारदार यांचे चारचाकी गाडीचे आरसी बुक, गाडीची चावी अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे तपासणी अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली. आता या कागदपत्रांची चौकशी सहकार, पोलीस व महसूल यंत्रणेमार्फत सुरू होणार आहे.
२0 जणांचे पथक
उपनिबंधक अमर शिंदे व साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी या कामी विशेष पथक नेमले होते. यात सहकार विभागाचे चार अधिकारी, १६ कर्मचारी, तीन पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश होता.
-----------------------------------
बिनधास्त तक्रार करा, कारवाई करू
अवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकावली असल्याने सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे बिनधास्त तक्रार करा, तक्रारदाराचे नाव गुप्त राखून तातडीने कारवाई करू असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.