उचगाव परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी रोज धडपडताहेत वृक्षप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:21+5:302021-03-23T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सुमारे एक हजारहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सुमारे एक हजारहून अधिक झाडांना पाणी घालण्यासाठी या परिसरातील वृक्षप्रेमी, शाळेतील विद्यार्थी रोज धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याची गरज आहे.
रेल्वे उड्डाण पूल ते उचगाव जकात नाका या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ‘झाडे जगवा’ उपक्रमांतर्गत आमदार ऋतुराज पाटील यांनी हजाराहून अधिक झाडे लावली आहेत. या झाडांना महानगरपालिकेमार्फत रोज पाणी घालण्यात येते. परंतु उन्हाळ्यात झाडांना पुरेसे पाणी मिळाले, तर ही झाडे जगतील, या विचारातून परिसरातील वृक्षप्रेमींनी व्हॉट्स अपच्या ग्रुपद्वारे झाड ग्रुप स्थापन केला असून, या झाडांना रोज पाणी देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या ग्रुपमध्ये सुमारे तीस ते पस्तीस वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत.
परिसरातील वृक्षप्रेमी कुटुंबाने सर्वप्रथम गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात या झाडांना पाणी देण्यास प्रारंभ केला. उन्हाळ्यात त्यांनी स्वत: पैसे खर्च करून आठवड्यातून दोनवेळा टँकरने पाणी दिले. त्यांचे पाहून सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांनीही पाणी देण्यासाठी मदत देऊ केली. काहींनी पैसे देऊ केले. आता एका ढकलगाडीत पाण्याची मोठी टाकी ठेवून दुतर्फा असलेल्या झाडांना ५० हून अधिक प्लास्टिकच्या कॅनमार्फत हे पाणी घातले जाते.
ट्री गार्डवर लक्षवेधी फलक लावून जनजागृती
‘मी तुम्हाला भरपूर ऑक्सिजन देतो, कृपया झाडांना पाणी द्या. ऑक्सिजन खूप महाग आहे. ओ दादा, मला पाणी द्या. दादा, मला खूप तहान लागली आहे. झाडे वाचवा, देश वाचवा. तुम्हाला जसे पाणी लागते, तसे मलाही लागते...’, असे संदेश लिहिलेले फलक या मार्गावर लावलेल्या प्रत्येक झाडांभोवती लावले आहेत. या ग्रुपमधील वृक्षप्रेमींच्या मुलांनी आपापल्यापरीने हा खारीचा वाटा दिला आहे.
शाळकरी मुलांनी झाडे घेतली दत्तक
उचगाव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना आंतरभारती शिक्षण संस्थेच्या करवीर प्रशाला, विक्रमनगर, टेंबलाई विद्यालय आणि भाई माधवरावजी बागल हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी, तसेच माजी विद्यार्थ्यांनी काही झाडे दत्तक घेऊन त्यांना रोज पाणी देण्याची जबाबदारी पार पाडली.
-----------------------------
फोटो: 22032021-kol-uchgaon tree water supply.jpg
फोटो ओळी :
उचगाव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना वृक्षप्रेमींमार्फत रोज पाणी दिले जाते.
===Photopath===
220321\22kol_1_22032021_5.jpg
===Caption===
फोटो: 22032021-kol-uchgaon tree water supply.jpgफोटो ओळी : उचगांंव जकात नाका ते टेंबलाई मंदिर परिसरातील झाडांना वृक्षप्रेमींमार्फत रोज पाणी दिले जाते.