तेरवाड येथे रस्त्यातील खड्डयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:08+5:302021-07-16T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील कुरुंदवाड रस्ता ते पाटील मळ्यातील महापुरासारख्या संकटकाळात बाहेर पडण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील कुरुंदवाड रस्ता ते पाटील मळ्यातील महापुरासारख्या संकटकाळात बाहेर पडण्यासाठी मंजूर झालेल्या रस्त्याचे श्रेयवादातून तीनवेळा उद्घाटन होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आमगोंडा पाटील यांनी ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर वृक्षारोपण करत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करत रस्त्याचे काम त्वरित सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महापुरासारख्या संकटकाळात पर्यायी व्यवस्था म्हणून कुरुंदवाड रस्त्यावरील गुरुकृपा पेट्रोल पंप ते पाटील मळा असा तीन किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याने तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. रस्त्यातील खड्डयांमुळे विद्यार्थी, ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्याचे मुरमीकरण करुन दुरुस्त करण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे ग्रामपंचायत, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते आमगोंडा पाटील यांनी रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण केले. तसेच या रस्त्याचे काम त्वरित सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अमोल खोत, युवराज पाटील, म्हादगोंडा पाटील, सिदगोंडा पाटील, अनिल पाटील, सतगोंडा पाटील, आण्णासो पाटील, दत्ता पाटील, नरसगोंडा पाटील, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
फोटो - १५०७२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - तेरवाड (ता. शिरोळ) येथील गुरुकृपा पेट्रोल पंप ते पाटील मळा दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आमगोंडा पाटील, अमोल खोत, युवराज पाटील उपस्थित होते.