विभागीय आयुक्तांनी घेतली झाडाझडती
By admin | Published: June 18, 2015 10:30 PM2015-06-18T22:30:54+5:302015-06-19T00:22:55+5:30
चोक्कलिंगम यांची क्रीडासंकुलास भेट : कामाच्या दर्जाबाबत कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी, क्रीडाधिकारी धारेवर
कोल्हापूर : संभाजीनगर येथील बहुचर्चित क्रीडासंकुलास पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी सकाळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी व क्रीडाधिकारी यांना कामाच्या दर्जाबाबत धारेवर धरले. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेले क्रीडासंकुल अजूनही वादाच्या भोवऱ्यातून काही केल्या सुटेना. गुरुवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी क्रीडासंकुलास भेट देत प्रथम टेनिस कोर्टची पाहणी केली. यावेळी गॅलरीकडे जाणाऱ्या मार्गावरील शटरला कमी दर्जाचा पत्रा का वापरला आहे, असे त्यांनी विचारले. पुढे त्यांनी ४०० मीटर धावपट्टीची पाहणी केली. यावरून धावपटूंना धावता येईल का, असा सवाल त्यांनी कंत्राटदार, अधिकारी यांना विचारला. धावपट्टीवर आणखी एक मातीचा थर पाहिजे. त्यानंतरच खेळाडूंना व्यवस्थित धावता येईल असे सुनावले. फुटबॉलच्या मैदानाची लेव्हल बिघडलेली आहे. ती सरळ करण्याची सूचना दिली. तेथून पुढे त्यांनी व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो मैदानांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी थेट शूटिंग रेंजची पाहणी केली. तेथून पुढे त्यांनी जलतरण तलावाची पाहणी केली. यात वारे वसाहत येथून जलतरण तलावात मिसळणारे पाणी जेसीबी लावून चर काढून बाहेर काढा, असे सांगितले. या दरम्यान फुटबॉल मैदानाच्या रस्त्याकडील कडेला प्रेक्षक गॅलरी बांधून गाळे भाड्याने देण्याची कल्पना जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आयुक्तांना सांगितली. यावर विभागीय आयुक्तांनी भाडेकरू चांगले मिळाले तर बरे, अन्यथा वाद होत राहतात; त्यामुळे यावर पुनर्विचार करावा, असे सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, ‘सार्वजनिक बांधकाम’चे अभियंता एन. एम. वेदपाठक, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, आदी अधिकारी उपस्थित होते.
चक्क भिंतीवर चढून केली पाहणी !
चोक्कलिंगम यांनी जलतरण तलावात जेलच्या ताब्यात असणाऱ्या जागेतून कसे पाणी येते याची पाहणी तलावाशेजारी बांधलेल्या भिंतीवर चढून केली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, नवनाथ फरताडे हेही भिंतीवर चढले होते.
कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलाची गुरुवारी सकाळी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अभियंता एन. एम. वेदपाठक, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते.