मुळासकट झाड अडकले राजाराम बंधाऱ्यात
By admin | Published: July 8, 2017 03:55 PM2017-07-08T15:55:16+5:302017-07-08T15:55:16+5:30
बंधाऱ्याला धोका : पुराच्या पाण्यातून वाहून आलेले झाड हटविण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
कसबा बावडा (जि. कोल्हापूर), दि. ८ : पुराच्या पाण्यातून मुळासकट वाहून आलेले भले मोठे झाड ‘राजाराम’ बंधाऱ्यात अडकल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने हे झाड त्वरित हटवावे, अशी मागणी होत आहे.
सध्या बंधारा पाण्याखाली असून बंधाऱ्यावर १७ फूट इतकी पाण्याची उंची आहे. प्रत्येकवर्षी जेव्हा पंचगंगेला पूर येतो तेव्हा या पुरातून वाहून आलेली लहान झाडे, झाडांच्या फांद्या पुढे राजाराम बंधाऱ्याच्या मोहरीत अडकून बसतात. स्थानिक नागरिक बंधाऱ्यावरील पाणी कमी झाल्यावर अशी झाडे मोहरीतून काढून त्याचा जळणासाठी वापर करतात. परंतु यावेळी पुराच्या पाण्यातून मुळासकट भले मोठे झाडच वाहून आल्याने ते एक - दोन लोकांना सहज हटवता येणे शक्य नाही.
आणखी बातम्या वाचा
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार
पाटबंधारे विभागाला या ठिकाणी जादा मनुष्यबळाचा वापर करून हे झाड हटवावे लागणार आहे. सध्या बंधाऱ्यात अडकलेल्या या झाडाला पाण्याचा प्रवाह जोरात पुढे ढकलत आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या मोहरीला धोका पोहोचू शकतो. सध्या पावसाने उघडीप दिल्याने बंधाऱ्याजवळील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
बंधारा दर्जा रिकामा झाल्यावर परत तो पुन्हा पाण्याखाली जाण्यापूर्वी हे झाड या ठिकाणाहून हटवावे, अशी मागणी होत आहे. पुराच्या पाण्यातून मुळासकट वाहून आलेले झाड राजाराम बंधाऱ्याच्या मोहरीत अडकले आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.