झाडेच म्हणाली, पाणी देता का पाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:20+5:302021-02-15T04:21:20+5:30
मोहन सातपुते उचगाव : रस्त्याकडील पाण्याविना सुकून चाललेली वृक्षवेली पाहून त्याचे मन सुन्न झाले... पण याच मनाने या ...
मोहन सातपुते
उचगाव : रस्त्याकडील पाण्याविना सुकून चाललेली वृक्षवेली पाहून त्याचे मन सुन्न झाले... पण याच मनाने या वृक्षांना कोणी पाणी देईल का, ही साद घातली अन शेकडो हातांनी कोमेजलेल्या वृक्षवेली टवटवीत केल्या. उचगाव (ता. करवीर) येथील सचिन आत्माराम सवाखंडे या ध्येयवेड्या वृक्षप्रेमीने केलेल्या आवाहनाला मॉर्निंग वाॅकर्सने प्रतिसाद देत टेंबलाईदेवी मंदिर ते टेंबलाईवाडी रस्ता परिसरातील कित्येक झाडांची देखभाल सुरू केली आहे. सावखंडे हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कार्यरत आहेत. दररोज रस्त्यावरून कामावर जाता-येता त्यांचे लक्ष कोमजलेल्या झाडांकडे जायचे. या झाडांना जगवायचे असेल, तर लोकसहभाग हवा, हे त्यांनी पक्के हेरले. यासाठी त्यांनी झाडांना संदेशरूपी पोस्टर्स लावले. ‘‘ तुमच्यासारखे मलाही पाणी लागते’’. विकतचा ऑक्सिजन महाग असतो ' कोणी मला पाणी देता का? पाणी" असे संदेश देणारे फलक झाडांवर लावले. प्रवाशांना हे संदेश चांगलेच भावल्याने अनेकजण फिरायला येताना बॉटल भरून पाणी आणून झाडांना घालू लागले आहेत. त्यामुळे कोमजलेली झाडेही चांगलीच बहरू लागली आहेत.
कोट : कित्येक लोक सकाळी फिरायला जातात, पण कधी झाडांचा विचार करत नाहीत की हे झाड आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात, हाच विचार लोकांच्या मनात रुजवला आणि रस्त्याच्या कडेला असणारी किंवा परिसरातील कोमेजलेली झाडे जगविण्यासाठी मोहीम राबविली. लोक स्वत:हून पाणी घालत आहेत. त्यामुळे कोमेजलेली झाडे टवटवीत झाली आहेत.
सचिन सवाखंडे
फोटो: १४ उचगाव सचिन सवाखंडे
कोमेजलेल्या झाडांना काठीचा व पाण्याचा आधार देणारा उचगावचा सचिन सवाखंडे.