खोची बंधाऱ्यात अडकलेले झाड अखेर काढण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:28+5:302021-04-24T04:23:28+5:30

खोची : गेल्या अनेक महिन्यांपासून खोची (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यात अडकलेल्या मोठ्या झाडाच्या लाकडाला आज ...

The tree stuck in the embankment was finally removed | खोची बंधाऱ्यात अडकलेले झाड अखेर काढण्यात यश

खोची बंधाऱ्यात अडकलेले झाड अखेर काढण्यात यश

Next

खोची : गेल्या अनेक महिन्यांपासून खोची (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यात अडकलेल्या मोठ्या झाडाच्या लाकडाला आज बाहेर काढण्यात आले. त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरळीत होऊन पडझड थांबण्यास मदत झाली आहे.

वारणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा खोची दुधगावदरम्यान बंधारा आहे. या बंधाऱ्यात दहा ते बारा फूट लांबीचे असंख्य फांद्या असलेले झाड नदीतून वाहत येत पिलर मध्ये अडकले होते. मुळातच उन्मळून पडलेले हे झाड मुळासकट बांधा असलेले होते. भला मोठा बांधा मुळासकट दोन्ही पिलरमध्ये अडकून बसला होता. तो काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत होती.

अगोदरच पिलरचे दगड निसटत जाऊन पिलर निकामी होतो की काय, अशी अवस्था झाली आहे. अनेक पिलरचे दगड निसटलेले आहेत. अशातच हे वाळलेले झाड पिलरच्या दृष्टीने धोकादायक बनले होते. या बंधाऱ्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेत त्वरित ही बाब येत होती.

पाटबंधारे विभागाने पूर्वी हे झाड काढण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याला यश आले नव्हते. आज ते झाड अखेर काढण्यात आले. यासाठी कटरने बुंध्याचा भाग, तसेच फांद्या कट करण्यात आल्या. त्यानंतर झाडास रस्सी बांधून शरद सहकारी साखर कारखान्याच्या जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. यामुळे पाण्याचा विसर्ग जोरदार सुरू झाला.

यासाठी पाटबंधारे विभागाच्या अभियंता नेहा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक ए.एस. गाडे यांनी आज ही मोहीम राबविली. त्यासाठी ग्रामस्थ संजय निळूगडे, दादासाहेब सरडे ,सचिन मोरे (दुधगाव), तानाजी पाटील,महेश पाटील,भानुदास गायकवाड(खोची) यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, दोन्ही बाजूला रस्त्यावर चर मारून बंधाऱ्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली.

चौकट-बंधाऱ्याच्या धोकादायक अवस्थेबद्दल ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आमदार राजू आवळे यांनी भेट देऊन दुरुस्तीसंदर्भात व बंधाऱ्यात अडकलेले लाकूड काढण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तात्काळ लाकूड काढण्यात आले.

फोटो ओळी- खोची येथील बंधाऱ्यात अडकलेले झाड (ओंडके)जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. (छाया-आयूब मुल्ला)

Web Title: The tree stuck in the embankment was finally removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.