सेवाग्राम आश्रमातील झाडे तोडली, कोल्हापुरात आबा कांबळेंचा 'आत्मक्लेश'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:09 PM2023-09-13T14:09:09+5:302023-09-13T14:19:38+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली
कोल्हापूर : सेवाग्राम आश्रमातील आणि नई तालीम परिसरातील झाडे अवैधरीत्या तोडल्याचा निषेध करून गो गीता सेवा संस्थेचे आबा कांबळे यांनी कळे येथे सोमवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती दिवशी एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
गो गीता सेवा संस्था येथे आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेचे पूजन शरद जोशी, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव आणि संस्थेचे माजी उपाध्यक्ष सरदार आंग्रे यांच्या हस्ते झाले. सर्व धर्म प्रार्थनेनंतर त्यांनी उपोषण केले. याप्रकरणी महसूल आणि वनमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. दरम्यान वर्ध्याचे वन परीक्षक अधिकारी रुपेश भास्करराव खेडकर यांनी दूरध्वनीवरून दोन दिवसात चौकशी करून कारवाई करत असल्याचे कळवून उपोषण सोडण्याची विनंती केली. सायंकाळी पाच वाजता सायंप्रार्थनेनंतर किरवे येथील पोलिस पाटील प्रशांत पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले.
उपोषणस्थळी कळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. संस्थेचे माजी सेक्रेटरी दामाजी वाळवेकर, खजानिस गणपतराव पाटील, बाबा रेडीकर, गीता सेवा संस्थेचे व्यवस्थापक डॉ. नामानंद कांबळे, डॉ. सुनंदा कांबळे, शेतकरी संघटनेचे बबन खाटांगळेकर, पंचगव्य चिकित्सक प्रणय शेलार, डॉ. विनायक साळुंखे, प्रमिला वनकुरे आदी उपस्थित होते.