बाजार समितीसाठी तिरंगी लढत
By admin | Published: June 14, 2015 01:51 AM2015-06-14T01:51:57+5:302015-06-14T01:51:57+5:30
१९ जागांसाठी १०८ रिंगणात : १२ जुलैला मतदान होणार; १४ रोजी मतमोजणी
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी १०८ जण रिंगणात राहिले आहेत. ६४८ जणांनी माघार घेतली असून, शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६३३ जणांनी माघार घेतल्याने अक्षरश: झुंबड उडाली होती. राष्ट्रवादी -जनसुराज्यची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास,’ कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. १२ जुलैला मतदान होणार असून १४ जुलैला मतमोजणी केली जाणार आहे.
समितीसाठी विविध गटांतून तब्बल ९०६ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ७५६ अर्ज शिल्लक राहिले होते. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी अवघ्या पंधराजणांनी माघार घेतली होती. शनिवारी सकाळपासून पॅनेलच्या घोषणेकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. संधी मिळणार नाही, हे अनेकांना अगोदरच माहीत होते, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी थांबल्याने नेत्यांबरोबर निवडणूक यंत्रणेवर ताण आला होता. दुपारी एक ते तीन या वेळेत सुमारे पावणे सहाशे अर्जांची माघारी झाल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. १९ जागांसाठी १०८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
कॉग्रेसमध्ये दुफळी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी कॉग्रेससोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल केले. तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने कॉग्रेसमध्ये उघड फूट पडली. ‘शेकाप’ने शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने गेले आठ दिवस सुरू असलेल्या घडामोडीला एकदम कलाटणी मिळाली.
गेले आठ-दहा दिवस राष्ट्रवादी-जनसुराज्य-कॉग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू होती. शुक्रवारी दिवसभर आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे व पी. एन. पाटील यांच्यात चर्चा झाली. पी. एन. पाटील सहा जागांवर आग्रही राहिले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा मुश्रीफ व कोरे यांच्यात तासभर चर्चा झाली.
यामध्ये पी. एन. पाटील यांना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सकाळी आमदार मुश्रीफ यांनी नागाळापार्क येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली.
येथेच पाटील यांच्याशी आघाडी करायची नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाटील यांच्याशी चर्चा बंद करत असताना सतेज पाटील यांच्याशी चर्चा सुरू ठेवली. अखेरच्या टप्प्यात सतेज पाटील यांना दोन जागा देत आघाडीची घोषणा केली.
शिवसेना-भाजप आघाडीचे नेतेही सतेज पाटील यांच्या संपर्कात होते; पण ते राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी पी. एन. पाटील आपल्याबरोबर येतील का? यासाठी चाचपणी सुरू केली; पण आमदार चंद्रदीप नरके आघाडीत असल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनेल करण्याचा निर्णय घेतला.
चार माजी संचालकांचा समावेश
राष्ट्रवादी आघाडीतून परशुराम खुडे व उदय पाटील, शिवसेना आघाडीतून बाबगोंडा पाटील, तर कॉँग्रेस आघाडीतून माजी सभापती संभाजीराव पाटील -कुडित्रेकर या चार माजी संचालकांना संधी देण्यात आली.
पत्रातून कळविला नकार
कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. शुक्रवारी (दि. १२) रात्रीच पी. एन. पाटील यांना आघाडीसोबत घ्यायचे नाही, हे जवळपास निश्चित झाले होते. तरीही औपचारिकता म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि अर्ध्या तासात पत्र पाठवून, आपणाला सन्मानजनक जागा देऊ शकत नसल्याने आपण पुढील विचार करावा, असे पत्र आमदार हसन मुश्रीफ यांनी पी. एन. पाटील यांना पाठविले.