शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 06:47 PM2023-01-18T18:47:39+5:302023-01-18T18:48:03+5:30
अहवालातील ठरावीक मुद्द्यांची तपासणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळाचे (पदुम), विशेष कार्य अधिकारी रा. सं. शिर्के यांनी ११ जानेवारीस दिले. यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग एक) बी.एस.मलुगडे यांची नियुक्ती केली आहे. याबाबत संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती. दहा दिवसांत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शिर्के यांनी दिला आहे.
महाडिक यांनी गेल्याच आठवड्यात ट्विट करून वार्षिक सभेनंतर गेले चार महिने मी शांत होते. संघामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. त्याचे फळ लवकरच समोर येईल असे जाहीर केले होते. त्यावरून त्या चौकशीची मागणी करणार हे स्पष्टच होते. त्यानुसार शासनाने हे आदेश दिले आहेत.
‘गोकुळ’दूध संघाच्या लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालात खरे व अचूक चित्र उघडकीस आणलेले नाही,अशी तक्रार महाडिक यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. गोकुळ संघाने या कालावधीतील कागदपत्रे चौकशी कामे संबंधित अधिकाऱ्यांना द्यावीत असेही आदेशात म्हटले आहे.
अहवालातील ठरावीक मुद्द्यांची तपासणी
लेखापरीक्षण अहवालात परिशिष्ट अ, ब, क असतात. परिशिष्ट अ मध्ये गंभीर मुद्द्यांची नोंद केली जाते, याच मुद्द्यांची चाचणी लेखापरीक्षणात तपासणी करावी,अशी मागणी महाडिक यांनी केली होती.