‘त्या’ त्रिकुटाने घातला २३९ तरुणांना गंडा
By admin | Published: September 26, 2016 12:51 AM2016-09-26T00:51:40+5:302016-09-26T00:51:40+5:30
तीन कोटींची फसवणूक : शासकीय खात्यांमध्ये नोकरीचे आमिष
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या शिवशांत बाळासाहेब माळी (रा. पट्टणकोडोली), नीलेश चंदू बनसोडे (रा. वाकड, पुणे) व नीळकंठ माने (हुपरी) या तिघांनी शासकीय खात्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध जिल्ह्यांतील सुमारे २३९ तरुणांची अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासांत उघडकीस आले आहे.
ज्या तरुणांची फसवणूक झाली असेल, त्यांनी हुपरी पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.
शिवशांत माळी, नीलेश बनसोडे व नीळकंठ माने या तिघांनी अनेक नातलग, मध्यस्थ व मित्रमंडळींच्या ओळखीच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी जिल्ह्यांतील सुमारे २३९ तरुणांकडून ५० हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम लाटली. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाबरोबरच अन्य शासकीय खात्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखविले, तसेच काही तरुणांना बोगस निवडपत्रे दिली. त्यातून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासांत पुढे आले आहे. याप्रकरणी अरुण पोपट फडतारे (रा. वाळवेकर नगर, हुपरी) या तरुणाने हुपरी पोलिसांत सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात करताच ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
या टोळक्याने सर्वसामान्य गोरगरीब घराण्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना मध्यस्थांकरवी आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठ्या रकमा उचलल्या आहेत. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध खात्यांतील सचिव, अप्पर सचिव, आदी अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या असणारी विना शिक्क्याची बनावट नियुक्तीपत्रे दिली आहेत. ही नियुक्तीपत्रे घेऊन हे तरुण नोकरीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी गेल्यानंतर खरी वस्तुस्थिती समोर आली. फसवणूक झालेल्या काही तरुणांनी या तिघांना शोधून काढून आपल्या रकमेची मागणी केली असता त्यांनी रकम देण्यास टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने या तिघांचे फसवणूक करण्याच्या उद्योगाचे बिंग फुटले. या टोळीतील शिवशांत माळी हा मूळचा पट्टणकोडोलीचा असून, तो गेल्या काही वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील बाळासाहेब राजकीय कार्यकर्ते आहेत. नीलेश हा पुण्याचाच असून, तो शिवशांतचा जिवलग मित्र आहे. नीळकंठ माने हा नाभिक व्यावसायिक असून, सामाजिक कार्य करण्याबरोबरच काही उद्योजकांची शासकीय कार्यालयातील कामे करून देण्याचेही काम करतो. त्याच्या सहवासात अनेक चांदी उद्योजक व तरुण नेहमीच असतात. फसवणूक प्रकरणात त्याचे नाव येताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला गेला आहे. (प्रतिनिधी)