‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

By Admin | Published: April 24, 2016 11:09 PM2016-04-24T23:09:34+5:302016-04-25T01:01:27+5:30

कारखाना निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस; तिरंगी लढतीची शक्यता, माघारीपर्यंत केवळ चर्चाच

The trials of 'Ajaara' are broken | ‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

googlenewsNext

ज्योतीप्रसाद सावंत--आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप आघाड्यांचा तिढा न सुटला नाही. त्यामुळे प्रसंगी स्वतंत्र आघाडीची तयारी ठेवत प्रमुख नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याने विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवेळी एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे गेलेल्या मंडळींनी आपापला सवतासुभा ठेवून पाच वर्षांची वाटचाल सुरू ठेवली. अनेकांनी आपल्या नेत्यांना रामराम करून सोयीने नेते स्वीकारले. काही मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला. यामुळे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.
दरम्यान, झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, तालुका संघ येथेही या संघर्षाचे पडसाद उमटत गेले. या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले. एक आमदार गमवावा लागला तर कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनीही पक्षाशी फारकत घेतली.
गेल्या वर्षभरात तर सत्ताधाऱ्यांमधील वाद जगजाहीर झाले. यातून चार भिंतीमधील चर्चा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. गोपनियता हा प्रकारच राहिला नाही. अनेक संचालकांची सुधारलेली आर्थिक स्थिती सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटली नाही. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्त्यांना कारखाना संचालकपदाची स्वप्ने पडू लागली. वेळोवेळी राजकीय पेचात सापडणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडून आपली कारखान्याची उमेदवारी घट्ट करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. नेत्यांनीही शब्द देऊन वेळ मारून नेली आणि आता मात्र ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने नेतेमंडळींना कार्यकर्त्यांचे ‘बंड’ थोपविण्याचे नव्हे आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.
अण्णा-भाऊ संस्था समूहप्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनाच आव्हान देत जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे. प्रचंड यंत्रणा व आर्थिक पाठबळ यामुळे अशोकअण्णांसोबत जाण्यास अनेकजण इच्छुक आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रवींद्र आपटे यांचा गट, विश्वनाथ करंबळी, श्रीपतराव देसाई यांच्यासह विद्यमान आठ संचालक यांनी यापूर्वीच अशोकअण्णांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष आहे. अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदय पवार, सुधीर देसाई अशी बड्या नेतेमंडळींची फौज राष्ट्रवादीकडे आहे. सोबत राष्ट्रीय काँगे्रस व छोटे-मोठे गट आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांचा भक्कम आधार हे राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. सद्य:स्थितीत जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारी मंडळी कितपत एकत्र राहणार यावरही राष्ट्रवादीचे यशापयश अवलंबून आहे.
एकीकडे अशोकअण्णांनी आपणाला कुणाचेही वावडे नाही असे सांगून आघाडीची बांधणी सुरू केली असताना राष्ट्रवादीत मात्र हा नको, तो नको, असाच सूरच आहे. गडहिंग्लज कारखाना निवडणूक निकालातून राष्ट्रवादीने काहीही बोध घेतलेला नाही. हेदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून माघारीपर्यंत चर्चाही सुरू राहणार आहे.

चंद्रकांतदादांचीही फिल्डिंग
सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजरा साखर कारखाना पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावली आहे.
एका बड्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. हा नेता गळाला लागला तर सर्व रसद पुरवून विरोधी आघाडी भक्कम करून ‘भाजप’च्या लेबलवर निवडणूक जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Web Title: The trials of 'Ajaara' are broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.