खराब रस्त्याला श्रद्धांजली: रस्ता मृत्यू पावला असल्याचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 06:13 PM2021-02-13T18:13:44+5:302021-02-13T18:29:13+5:30
Road Kolhpapur- फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरीकांनी शनिवारी रस्त्याच्या मध्येच निधन, रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून खराब रस्त्याला श्रद्धांजली वाहून येथील रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरीकांनी शनिवारी रस्त्याच्या मध्येच निधन, रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून खराब रस्त्याला श्रद्धांजली वाहून येथील रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
फुलेवाडी रिंग रोडच्या संदर्भात नागरीकांनी अनेक वेळा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. नवीन रोड झाला पण पण जुना रिंग रोड अजुनी तसाच खड्डे पडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याला साधे डांबरीकरण झाले नाही.
या रस्त्यावरून अरुण सरनाईक नगर, कनेरकर नगर, लक्ष्मीबाई साळुंखे कॉलनी , नचीकेतनगर या चार ते पाच मोठ्या वसाहतीमधील शेकडो लोक आजही प्रवास करत असतात. पण नवीन रस्ता झाल्यामुळे प्रशासनाने जुन्या रस्त्याला वगळून टाकलेले आहे, अशी भावना झालेल्या नागरीकांनी अनेक वेळा आंदोलन करून अधिकार्यांना निवेदनही दिले. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वैतागून परिसरातील नागरीकांनी रस्ता मृत्यू पावला आहे असा फलक लिहून अनोखे आंदोलन केले.
रस्ता मेला आहे
हा फलक रस्त्याच्या मधोमध लावून त्या फलकास हार आणि गुलाल लावून रस्त्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कोण मेले, कोण मेले, तर रस्ता मेला. कोणामुळे मेला तर प्रशासनामुळे मेला अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर , वल्लभ देसाई, अक्षय चाबूक, समीर जगदाळे, अमित पाटील, वैशाली सूर्यवंशी, रत्नंम दृपडकार, गौरव ढेंगे आदी सहभागी झाले होते.