ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 06:07 PM2020-06-24T18:07:54+5:302020-06-24T18:09:34+5:30
ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होते. त्यांच्या आठवणींना रविवारी कोल्हापुरातील कलाकारांनी उजाळा दिला.
कोल्हापूर : ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांचे नुकतेच पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होते. त्यांच्या आठवणींना रविवारी कोल्हापुरातील कलाकारांनी उजाळा दिला.
कांचन नायक यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बरेचसे काम कोल्हापुरात केले होते. त्यांच्यासाठी कोल्हापुरातील एका सभागृहात कोल्हापूर क्राइम डायरी टीममधील दिग्दर्शक अजय कुरणे, निर्मिती व्यवस्थापक अजय खाडे, साहाय्यक दिग्दर्शक समीर भोरे, संयोजन टीम सदस्य राजेश शिंदे, शिवाजी खाडे यांनी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूरवर त्यांचे विशेष प्रेम होते.क्राईम डायरी या मालिकेमुळे त्यांचे कोल्हापुरात सतत येणे-जाणे असायचे. एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अत्यंत साधेपणाने आपल्यासोबत काम करतो आहे, याचा कोल्हापूरकरांना नेहमी अभिमान वाटायचा, अशा आठवणी कलाकारांनी यावेळी ताज्या केल्या.
या शोकसभेला अभिनेता इम्तियाज बारगीर, स्वप्निल राजशेखर, संजय मोहिते, शुभांगी साळोखे, ज्ञानेश मुळे यांच्यासह कांचन नायक यांच्यासोबत काम केलेले कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.