राजर्षी शाहूंना २०० कलाकारांची लोकनृत्य सादर करून मानवंदना, देशभरातील दहा राज्यांतील कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:45 AM2022-05-16T11:45:31+5:302022-05-16T11:45:57+5:30
महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब, हरयानामधील कलाकारांनी दिलखेचक अदाकारी करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
कोल्हापूर : महाराष्ट्राची ठसकेबाज लावणी, पंजाबमधील भांगडा नृत्य, काश्मीरमधील रोफ नृत्य, हरयानातील घुमर असे दहा राज्यांतील २०० कलाकारांनी लोकनृत्य सादर करून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना रविवारी सायंकाळी मानवंदना दिली. सर्वच राज्यातील लोकनृत्यांना श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू मिलमध्ये नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, जिल्हा प्रशासन आणि राजर्षी शाहू फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे लेखा अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा सत्कार झाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नृत्य दिग्दर्शक अरविंद रजपूत, नीलेश रजपूत आणि सर्व संयोजकांचा सत्कार करण्यात आला.
छत्तीसगडमधील कलाकारांनी धोतर परिधान करून नृत्य करीत लक्ष वेधले. या नृत्याला ढोल, टाळ, कैचाळची साथ मिळाली. कर्नाटकातील कलाकारांनी हालाकी सुग्गी कुनिथा हे आदिवासी नृत्य सादर केले. यातील कलाकारांनी अतिशय चपळाईने फेर धरले होते. जम्मू-काश्मीरमधील कलाकारांनी रोफ नृत्याचा आविष्कार केला. ताल, लयबद्धरीत्या त्यांनी केलेल्या नृत्याला वाहवा मिळाली.
पंजाबच्या कलाकारांनी भांगडा, आसामच्या कलाकारांनी बिहू नृत्य, हरयानातील कलाकारांनी घुमर नृत्य, गुजरातच्या कलाकारांनी सिटुरी धमाल, मध्य प्रदेशातील कलाकारांनी गुदम बाजार नृत्य, महाराष्ट्रातील लावणी, धनगरी नृत्य सादर केले. तुडुंब भरलेल्या हॉलमधील प्रेक्षक सर्व राज्यातील कलाकारांच्या नृत्यास टाळ्यांनी दाद देत राहिल्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत कार्यक्रम रंगत गेला. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरयानामधील कलाकारांनी दिलखेचक अदाकारी करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
नारळ डोक्याने फोडले अन्
गुजरातच्या कलाकाराने व्यासपीठाच्या खाली येत नृत्य करीत हवेत उंच नारळ उडवून डोक्याने फोडले. हा क्षण मोबाईलवर टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले. राज्यनिहाय सादर केलेल्या नृत्यांचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
लावणीतील अदाकारीने घायाळ
लावणीतील नृत्यावेळी नऊवाडी साडीतील लावण्यवतींनी केलेल्या मोहक अदाकारीने घायाळ झालेल्या प्रेक्षकांनी शिट्या वाजवून त्यांच्या कलाविष्काराला दाद दिली. लावणीचे नृत्य संपेपर्यंत टाळ्या आणि शिट्या वाजत राहिल्या.
२०० कलाकारांचे एकाचवेळी नृत्य
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी दहा राज्यांतील २०० कलाकारांनी व्यासपीठासमोर एकाचवेळी येत आपआपल्या राज्यातील लोकनृत्य सादर केले. त्यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या गणवेशातील कलाकाराने लक्ष वेधून घेतले.