‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस’साठी तिरंगी लढत

By admin | Published: February 15, 2015 11:28 PM2015-02-15T23:28:09+5:302015-02-15T23:45:57+5:30

निवडणुकीची रणधुमाळी : कर्जावरील व्याजदर, सत्तारूढ गटाचा कारभार हेच प्रचाराचे मुद्दे

Tricolor for 'Government Servants' | ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस’साठी तिरंगी लढत

‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस’साठी तिरंगी लढत

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर  -राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीत कर्जावरील व्याजदर, सत्तारूढ गटाचा कारभार हेच प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत. सत्तारूढ पंदारे गटाविरोधात एकास एक लढत देण्यासाठी विरोधकांनी गेली दोन वर्षे बांधणी केली होती; पण सध्याच्या हालचाली पाहता तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
बॅँकेच्या २००८ च्या निवडणुकीत १९ पैकी १० जागा जिंकत रवींद्र पंदारे यांच्या पॅनलने सत्ता ताब्यात घेतली. विरोधी विश्वासराव माने गटाला चार, तर छन्नूसिंग चव्हाण पॅनलला पाच जागा मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत बॅँकेच्या राजकारणात अनेक उलथापालथी झालेल्या आहेत. छन्नूसिंग चव्हाण पॅनलचे नेते राजन देसाई यांनी स्वाभिमानी परिवर्तन आघाडीचे राजेंद्र पाटील, बाळासाहेब घुणकीकर यांना एकत्रित करीत एकास एक लढत देण्याचा प्रयत्न केला आहे; पण विश्वासराव माने यांच्या नेतृत्वाखाली रंगराव आळवेकर, सदाशिव देवताळे व एम. एस. पेडणेकर यांनी तिसरे पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच वर्षांत सभासदांना १० टक्के लाभांश देत, बॅँकेचा शून्य टक्के एन. पी. ए., आॅडिट वर्ग ‘अ’, ठेवीमध्ये ७१ कोटींवरून १७५ कोटींपर्यंत वाढ, रिझर्व्ह बॅँकेचे ‘अ’ मानांकन व राज्यस्तरीय सात पुरस्कार, कोअर बॅँकिंग या सत्तारूढ गटाच्या जमेच्या बाजू आहेत; तर इतर वित्तीय संस्थांपेक्षा जादा व्याजदर घेऊन सभासदांची पिळवणूक केली आहे. अनेक ठिकाणी अनाठायी खर्च करून बॅँकेचे नुकसान केले, त्याचबरोबर कर्ज घेताना १० टक्के रक्कम कपात करून घेतली जाते, हे विरोधकांचे मुद्दे प्रचारात राहणार आहेत.

व्याजदर, सत्तारूढ गटाने केलेली उधळपट्टी बॅँकेच्या सुज्ञ सभासदांनी पाहिलेली आहे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर व्याजदर कमी करूच; त्याचबरोबर कर्जदाराला ठेवीदार करू व नोकरभरतीत सभासदांच्या पाल्यांनाच प्राधान्य देऊ.
- बाळासाहेब घुणकीकर, नेते, राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनल

पाच वर्षांपूर्वी सभासदांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून काम केले. या विश्वासाच्या बळावरच ७१ वरून १७५ कोटींच्या ठेवी झाल्या. पारदर्शक व स्वच्छ कारभाराच्या बळावरच बॅँकेला सात पुरस्कार मिळाले. रिझर्व्ह बॅँकेने ‘ए’ मानांकन दिले.
- रवींद्र पंदारे, नेते, राजर्षी शाहू सत्तारूढ अनुभवी पॅनल


कर्जाच्या वसुलीचा खर्च सभासदांच्या नावावर टाकणे, कर्जातून १० टक्के रक्कम कपात करणे असे अनेक चुकीचे निर्णय सत्तारूढ गटाने घेतलेले आहेत. व्याजदर जादा घेऊन पिळवणूक केली आहे. ‘ब’ वर्गातील सभासदांना कर्जवाटप केलेले नाही.
- संभाजीराव पोवार, संचालक, विश्वासराव माने गट

Web Title: Tricolor for 'Government Servants'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.