त्रिगुणात्मिका अंबाबाई
By admin | Published: September 30, 2014 06:38 PM2014-09-30T18:38:42+5:302014-09-30T18:38:42+5:30
आदिशक्ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. तिने आपल्या तेजातून महासरस्वती आणि महाकालीला प्रकट केले. अंबाबाईच्या या त्रिगुणात्मिका रूपाचे दर्शन आज (मंगळवार) शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला घडले.
- नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला पूजा
कोल्हापूर : विश्वनिर्मिती करणारी आदिशक्ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. तिने आपल्या तेजातून महासरस्वती आणि महाकालीला प्रकट केले. अंबाबाईच्या या त्रिगुणात्मिका रूपाचे दर्शन आज (मंगळवार) शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला घडले.
अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात आज सकाळी भगवान गिरी महाराज यांनी देवीचा अभिषेक केला. त्यानंतर देवीची त्रिगुणात्मिका रूपात पूजा बांधण्यात आली. ‘दुर्गासप्तशती’ हा आदिशक्ती जगदंबेचे वर्णन करणारा सिद्धग्रंथ. अंबाबाईला विश्वाचे आदिकारण मानून केलेल्या रचनेत अंबाबाईने स्वत:तून महाकालीला आणि महासरस्वतीला प्रकट केले. या दोघींना स्वत:च्या गुणांतून मिथुने निर्माण करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे अंबाबाईने स्वत: ‘लक्ष्मी आणि ब्रम्ह्मा’, महाकालीने ‘शंकर आणि सरस्वती’, महासरस्वतीने ‘विष्णू आणि गौरी’ला प्रकट केले. त्यानंतर ब्रह्मासह सरस्वतीने विश्व निर्माण करायचे. विष्णूसह लक्ष्मीने त्याचे पालन आणि शंकराने गौरीसह संहार करायचा, असा नियम ठरवून या तिघी स्वनंदात करवीरात रमल्या. त्याचे साकार रूप म्हणजे हे पाच शिखरातले मंदिर. त्याचे प्रतिरूप आज या पूजेच्या माध्यमातून गाभाऱ्यात साकारले. ही पूजा सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बंधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा आणि प्रसन्न मालेकर यांची आहे. मूर्ती किशोर सुतार व प्रशांत इंचनाळकर यांनी घडविल्या.