घरगुती नैवेद्याने त्र्यंबोली यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:26+5:302021-07-14T04:26:26+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन, डोक्यावर पाण्याचे कलश घेतलेल्या कुमारिका, सुवासिनी आणि घरगुती नैवेद्याने मंगळवारी त्र्यंबोली ...
कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन, डोक्यावर पाण्याचे कलश घेतलेल्या कुमारिका, सुवासिनी आणि घरगुती नैवेद्याने मंगळवारी त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेला प्रारंभ झाला. कोरोनामुळे सध्या मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिराबाहेरूनच देवीला नमस्कार केला आणि नैवेद्य अर्पण केले. यात्रेनिमित्त देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. तर कोरोना महामारीपासून माणसाची मुक्तता व्हावी, यासाठी यज्ञ करण्यात आला.
दरवर्षी आषाढ महिन्यातील मंगळवार व शुक्रवारी त्र्यंबोली देवीची यात्रा असते. यादिवशी नदीला आलेले नवे पाणी कळशीत भरून त्याचे पूजन केले जाते. पी ढबाकच्या गजरात भागाभागातील तरुण मंडळांच्यावतीने त्र्यंबोली मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यात कलश घेतलेल्या सुवासिनी व कुमारिकांना मोठा मान असतो. आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने यात्रेला जोर येतो, मंदिरात देवीला पाणी वाहून नैवेद्य दाखवला जातो. मंगळवारी यात्रेचा पहिला दिवस होता. यानिमित्त सकाळी देवीचा महाअभिषेक, आरती करण्यात आली. त्यानंतर सूर्यकांत गुरव, संतोष गुरव, प्रदीप गुरव यांनी सालंकृत पूजा बांधली. कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी यज्ञ करण्यात आला.
यात्रेची सुरुवात घरगुती नैवेद्याने झाली. भागाभागातील महिला, मुली कलश घेऊन मंदिराजवळ आले व बाहेरूनच देवीला पाणी वाहून नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक जणांनी नैवेद्यएवजी कोरडी शिधा सामग्री व आंबील अर्पण केले.
----
फोटो नं १३०७२०२१-कोल-त्र्यंबोली यात्रा०१,०२
ओळ : आषाढातील पहिल्या मंगळवारी कोल्हापुरातील त्र्यंबोली देवीच्या आंबील यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्त भाविकांनी पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---