पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:52 PM2021-08-03T19:52:04+5:302021-08-03T19:53:51+5:30

Religious programme Tryamboli Yatra Kolhapur : आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली.

Trimboli Yatra to the police headquarters simply | पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने

आषाढ महिन्यातील अखेरच्या मंगळवारी कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाच्यावतीने त्र्यंबोली यात्रा साजरी करण्यात आली. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणानेटेकडीवर गर्दी : अखेरच्या शुक्रवारी न येण्याचे भाविकांना आवाहन

कोल्हापूर : आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली.

एकादशी, संकष्टी चतुर्थी, कोरोना, महापूर यामुळे यंदाचे तीन आठवडे यात्राच साजरी करता न आल्याने मंगळवारी त्र्यंबोली टेकडीवर भाविकांनी गर्दी केली होती, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगविली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी अखेरच्या शुक्रवारी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पुजाऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आषाढ महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीची यात्रा असते. नदीला आलेले नवे पाणी देवीला वाहून नैवेद्य दाखविला जातो. आषाढ सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात फारशा यत्रा झाल्या नाहीत. नंतरच्या आठवड्यात एकादशी, गुरुपौर्णिमा आणि संकष्टी चतुर्थी आली, त्यानंतर मुसळधार पाऊस आणि महापूर आला.

अजूनही पूरबाधित नागरिक या संकटातून सावरलेले नाहीत. त्यामुळे सलग तीन आठवडे त्र्यंबोली यात्रा साजरी करता आली नाही. आता आषाढातला हा शेवटचा आठवडा असल्याने मंगळवारी मात्र यात्रांचा एकच धडाका उडाला.

पोलीस मुख्यालयाच्यावतीने दरवर्षी त्र्यंबोली देवीचा मुखवटा पालखीतून वाजत गाजत नेऊन यात्रा साजरी केली जाते. यंदा कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत साधेपणाने पालखी काढण्यात आली.

पी ढबाक या पारंपरिक वाद्याच्या गजरात महिला डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेऊन मंदिराकडे आल्या. त्यानंतर पोलिसांच्यावतीने देवीला मानवंदना देण्यात आली. यासह शहरातील विविध मंडळांच्यावतीने यात्रा साजरी करण्यात आली.

यात्रेनिमित्त दुपारनंतर टेकडीवर भाविकांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दी पांगवावी लागली. आता येत्या शुक्रवारी आषाढातील अखेरची यात्रा आहे तरी भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पुजारी प्रदीप गुरव यांनी केले आहे.

देवीची मत्स्य रूपातील पूजा

यात्रेनिमित्त सकाळी ८ वाजता महाभिषेक व षोडशोपचारे पूजा व हवन करण्यात आले. त्यानंतर पुजारी प्रदीप गुरव यांनी देवीची मत्स्य अवतारातील पूजा बांधण्यात आली.
 

Web Title: Trimboli Yatra to the police headquarters simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.