Maharashtra Assembly Election 2019 : कोल्हापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा तिहेरी प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:01 PM2019-10-15T12:01:53+5:302019-10-15T12:03:37+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिल्याने शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचा सध्या तिहेरी प्रचार सुरू आहे.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिल्याने शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचा सध्या तिहेरी प्रचार सुरू आहे.
एकीकडे दक्षिणमध्ये भाजपचेच उमेदवार असलेल्या अमल महाडिक यांच्यासाठी जोडण्या सुरू असतानाच दुसरीकडे युती धर्म पाळण्यासाठी ‘उत्तर’मधून राजेश क्षीरसागर यांचाही प्रचार सुरू आहे. उत्तरमध्ये शिवसेनेचा उमेदवार असल्याने प्रचाराचा बहुतांशी भार क्षीरसागर यांच्यावरच असून आवश्यक वेळी भाजप पदाधिकारी उपस्थिती लावत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी एका दिवसात तीन सभा घेऊन शुक्रवारी क्षीरसागर यांच्या पाठीशी राहण्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. दुसरीकडे दक्षिणमध्ये अमल महाडिक यांच्यासाठीही त्यांनी मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये भगवान काटे, संगीता खाडे, दौलत देसाई यांचे भाजप प्रवेशही करून घेतले. या मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी बहुतांशी जबाबदारी घेतली आहे.
त्यामुळे वेळात वेळ काढून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पालकमंत्री आरोग्य यंत्रणेचे प्रमुख विजय जाधव, सांस्कृतिक मंडळाचे संचालक अशोक देसाई, भिवटे हे पदाधिकारी सोमवारी सकाळी पुण्याला रवाना झाले आहेत. दिवसभर या मंडळींनी तेथे प्रचार केला असून रात्रीही घराघरांत हे पदाधिकारी प्रचार करत होते.
महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे हे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याच्या तयारीसाठी याआधीच तीन दिवस पुण्यात तळ ठोकून होते. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना तीन ठिकाणी प्रचाराचे नियोजन करावे लागत आहे.